विज्ञान रंजन – पाऊस की ‘सुपर’ उन्हाळा?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>>विनायक<<

माणसांच्या जगात सर्वत्र विविध प्रकारचा गोंधळ माजलेला असताना तिकडे निसर्गातही सर्व काही आलबेल आहे असं नाही. सध्या उन्हाच्या तडाख्याबरोबर आणि सर्वत्र जाणवणाऱ्या तप्त झळांसोबत ‘सुपर एल निनो’च्या बातम्या येणं सुखावह नाही. आपल्या देशातल्या पावसाळय़ाच्या मोसमावर या ‘सुपर एल निनो’चा विपरीत परिणाम होऊ शकतो. तो कसा असेल याची चाहूल भयंकर उन्हाळा देतोय. आता मे महिना संपत आलाय. आजच म्हणजे 1 जूनला आपल्या देशात नैऋत्य (साउथ-वेस्ट) मान्सून वारे भरपूर पावसाळी ढग घेऊन येतात. केरळ राज्यात याच तारखेला पहिला जोरदार पाऊस पडणं अपेक्षित असतं. मग ती मेघमाला सरकत पुढे आपल्या महाराष्ट्रापर्यंत येते आणि 7 जूनला ‘मृग’ नक्षत्र लागल्यावर पाऊस सुरू होतो. ‘ग्रीष्म संपता, मृगापरि मृग धावुनि हा आला’ असं त्या पावसाचं कविवर्णन.

गेल्या दोन दशकांत निसर्गाचीही गणितं चुकत आहेत. त्यातच या वर्षी ‘सुपर एल निनो’ची धोक्याची घंटा वाजली आहे. तसे समुद्रावरचे भन्नाट वारे कायमच वाहत असतात. त्यांचे प्रकार शालेय वयात भूगोलाच्या पुस्तकात वाचलेले, आठवत असतील तर खारे वारे, मतलई वारे आणि व्यापारी वारे यांची नोंद होती. यापैकी ‘व्यापारी’ वारे किंवा ‘ट्रेड विण्ड्स’च्या वहनात काही ठरावीक वर्षांनी म्हणजे साधारण सात वर्षांच्या चक्राने उलट-सुलट बदल होतात. या वाऱ्यांबरोबर सागरी थंड अथवा उष्ण हवेचे झोत भूभागावरही येतात. एकेकाळी या उष्ण वाऱ्यांच्या (एल निनो) दर्यावर्दी व्यापाऱ्यांना त्रास व्हायचा, म्हणून त्याला ‘ट्रेड विण्डस्’ किंवा ‘व्यापारी’ वारे म्हटलं गेलं इतकंच. वास्तविक, त्याचा आर्थिक ट्रेडशी काही संबंध नाही. उत्तर गोलार्धात हे वारे पश्चिम ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेकडून पश्चिमेकडे पॅसिफिक महासागरात थैमान घालतात. त्यामुळे या भागातील सागरी पाण्याची पातळीही काहीशी वाढते. हे पाणीही तापतं. (एल निनोमध्ये ते थंड होतं.)

पृथ्वीवरच्या समशीतोषण (सबट्रॉपिकल) भागातून विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूंच्या तीस अक्षांशापर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार होतो. ‘सदर्न लॅसिलेशन’ किंवा दक्षिण गोलार्धातील वाऱ्यांच्या (‘एल निनो’ प्रकारच्या) दोलनामुळे (ऑसिलेशन) या भागातील सागरी पाण्याचे तापमान वाढतं. साहजिकच वरच्या वातावरणातील हवा तापून गरम वारे वाहतात. त्याचाच अनुभव आपण सध्या घेत आहोत. त्यातच ‘सुपर एल निनो’चा परिणाम असेल तर आपल्याकडे नैऋत्य मान्सून वारे जो पाऊस घेऊन येतात तो कमी होणार. हे सगळं समजायला थोडं किचकटच आहे; पण आपण एवढं लक्षात ठेवू या की, कधी दोन तर कधी सात वर्षांच्या चक्राने होणारा परिणाम उष्णता वाढवतो आणि याउलट ‘ला निना’ प्रकारचा परिणाम सागरी हवामान थंड करून भरपूर पाऊस आणतो. जगातलं आणि त्यातही आपल्या देशातलं पावसांचं ‘मॉडेल’ (पर्जन्यमान) त्यावर ठरतं. ही ‘एल निनो’ आपत्ती यावेळी काही पहिल्यांदाच येत नाही, परंतु यंदा त्याची तीक्रता अधिक असल्याचं म्हटलं जातं. म्हणूनच त्याला ‘सुपर एल निनो’ म्हटलं गेलंय. त्यामुळे व्यापारी वाऱ्यांची क्षमता कमी झाली आहे.

परिणामी नैऋत्येकडून, पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून ‘घनघनमाला नभी’ कधी दाटतील याचा अंदाज नाही. आपल्या देशातील शेती पूर्णतया पावसावर अवलंबून आहे. भातासारख्या पिकाला (आणि उसालाही) भरपूर पाणी लागतं. आभाळातून पाणी पडलंच नाही तर ते जमिनीत मुरणार कुठून आणि विहिरीही कोरड्या पडणार. आधीच ‘बोअरवेल’ची खोली दिवसेंदिवस दोनशे फुटांपर्यंत (किंवा अधिक) गेली आहे. भूगर्भात पाण्याचा ठणठणाट असून पावसाची प्रतीक्षा शेतकरी आणि सर्वत्र जनता आतुरतेने करत आहे.

असा सुपर ‘एल निनो’चा फटका हिंदुस्थानला एकोणिसाव्या शकतात 1877-78 च्या पावसाच्या मोसमात बसला होता. त्यावेळच्या एल निनोने आणलेल्या दुष्काळाने इजिप्तपासून चीनपर्यंत मोठा प्रदेश व्यापला. दोन ते तीन कोटी लोकांचा भूकबळी गेला. त्यावेळी ही संख्या जागतिक लोकसंख्येच्या 4 टक्के एवढी होती.

आता तंत्रज्ञान खूप प्रगत झालंय. पाणी नसणाऱ्या प्रदेशात बोगदे खणूनही पाणीपुरवठा करता येतो. जिथे पावसाचं पाणी पडतं तिथेच ते ‘पकडून’ आणि साठवून ज्या ठिकाणी त्याची गरज आहे. तिथे (भुयारी रेल्वेसारख्या) मोठय़ा जलबोगद्यांमधून न्यायला पाहिजे. कालवे काढले तर पाणी मधेच कोणी घेतं किंवा कालव्यात कालांतराने गाळ साचतो.

आपल्या देशात आणि महाराष्ट्रात पावसाचं पाणी जेव्हा ‘कमी’ पडतं तेव्हाही थोड्या कालावधीत धो धो बरसून आपला ‘कोटा’ बराच पूर्ण करतं. त्याचा ‘साठा’ करून ते वर्षभर पुरेल अशी यंत्रणा असेल तर पाच-सात वर्षांनी येणाऱ्या एल निनोची धास्ती बाळगण्याचं कारण नाही. पावसाची ‘वाट’ पाहत शेतकरी आभाळाकडे नजर लावून कष्टी चेहऱ्याने बसलाय हे पारंपरिक दुष्काळी चित्र बदलणं प्रगत तंत्रज्ञानाने शक्य आहे. पाऊस नाही पण पाणी उपलब्ध आहे अशी स्थिती आली पाहिजे. असे उपाय खर्चिक, कठीण पण जलसमस्या कायमची सोडविणारे ठरतील. कोविड काळातही देशात दीडपट धान्योत्पादन करणाऱ्या शूर शेतकऱ्याला दिलासा मिळाला तरच इतरांनाही सुखाचे चार घास मिळतील. ‘एल निनो’च्या संभाव्य परिणामांना तोंड देण्याची तयारी सरकारी पातळीवर सुरू असेल अशी अपेक्षा करू या. त्याचबरोबर विज्ञान संस्थांनी एरवीही याबाबत जनजागृती करायला हवी.