लेख : कलामहर्षी केकी मूस : एक अवलिया कलाकार!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्र. ह. दलाल

कलामहर्षी केकींकडे अनेक कला होत्या. ते उत्कृष्ट छायाचित्रकार तर होतेच, शिवाय वॉटर कलर प्रिंटिंग, ऑईल कलर प्रिंटिंग, क्ले मॉडलिंग, ट्रिक फोटोग्राफी, वूड कार्विंग, ओरोगामी, शिल्पकला, काष्ठ शिल्पकला, स्केचिंग, मूर्तिकला इत्यादी कलेच्या सर्वच प्रांतात त्यांना गती होती. केकींनी टेबलटॉप, स्टील लाईफ, पशुपक्षी या प्रकारची छायाचित्रे  विशेष अग्रक्रमाने व आवडीने टिपली आहेत. यात टेबलटॉप प्रकारातील त्यांची छायाचित्रे अधिक गाजली. विविध घटकांची कलात्मक मांडणी करून एखादा विषय किंवा आशय त्यातून अभिव्यक्त करण्याचा हा कलाप्रकार चित्राइतकाच सर्जनात्मक आहे.

keki-mouseआजपासून 29 वर्षांपूर्वी म्हणजे 31 डिसेंबर 1989 रोजी जगप्रसिद्ध छायाचित्रकार असलेल्या एका अवलिया अष्टपैलू कलाकाराने स्वतःला अनेक वर्षे बंदिस्त करून घेतलेल्या एका बंगल्यात कलेची अखंड साधना करीत अखेरचा श्वास घेतला. विशेष म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतरच एवढा मोठा महान कलाकार या शहरात राहत होता, हे अनेकांना कळले. चाळीसगाव हे जळगाव जिह्यातील तालुक्याचे गाव. या कलाकारामुळेच ते प्रसिद्धीच्या झोतात आले. अशा या नामवंत, गुणी व नेहमीच प्रसिद्धीपासून चार हात दूर राहिलेल्या छायाचित्रकाराचे नाव होते खुस्रो माणेकजी मूस. परंतु सारे जग त्यांना ओळखते ते मात्र केकी मूस याच नावाने. ‘बापूजी’ हे त्यांचे मित्रपरिवारातील टोपणनाव. त्यांची आई त्यांना लाडाने ‘केकी’ म्हणत असे. पुढे त्यांनीही ‘केकी’ हेच नाव रूढ केले.

कलामहर्षी केकी मूस यांचा जन्म मुंबईतील एका उच्चभ्रू वसाहतीत मलबार हिल येथे 2 ऑक्टोबर 1912 रोजी झाला. ते जन्माने पारशी होते. त्यांचे मामा स्वातंत्र्यपूर्व काळातील नामवंत बिल्डर होते. ते अविवाहित होते. त्यांनी केकीला त्यांचा मुलगा मानले होते. त्यांच्या आईचे नाव पिरोजाबाई होते. 1920 मध्ये खान्देशातील रणरणत्या उन्हातल्या दिवशी माणेकजी पत्नी व सुमारे आठ वर्षांच्या एका गोंडस मुलाला घेऊन मध्य रेल्वेच्या चाळीसगाव स्टेशनवर उतरले. त्या वेळी चाळीसगाव हे एक लहानसे खेडेगावच होते. त्या गावी व्यापार करून स्थायिक होण्याची त्यांची मनीषा होती; पण त्या गोंडस मुलाला मात्र चाळीसगाव त्यावेळी फारसे रुचले नाही. त्याला आवडत होते ते मलबार हिलवरील मामाचे घर. त्या भरल्या घरामधील सर्व नातलगांची त्याला आठवण येई. त्यामुळे वडिलांनी त्याला मुंबईला  पाठवून दिले. मुंबईला येताच मामांनी त्याच्या शिक्षणाची सोय केली.

शालेय शिक्षण पूर्ण करून केकीने विल्सन कॉलेजमधून पहिल्या वर्गात पदवी प्राप्त केली व  लंडनला जाऊन कलेचे शिक्षण घेण्याची इच्छा मामांकडे व्यक्त केली. मात्र आपल्या बांधकामाच्या व्यवसायातच केकीने मदत करून पुढे हा व्यवसाय सांभाळावा, अशी त्याच्या मामाची इच्छा होती. अर्थात केकीच्या मनात मात्र वेगळेच विचार घोळत होते. कलेचे विशाल, विस्तीर्ण व सुंदर क्षेत्र त्यांच्यातील कलाकाराला खुणावत होते. अन् नियतीच्या मनातही तेच होते. अखेर त्यांनी मामांना स्पष्ट नकार दिला. मामाही संतापले व त्याला त्याच्या आईवडिलांकडे पाठवून दिले.

चाळीसगावी त्यांच्या घराच्या आजूबाजूस भिल्ल, पारधी, वंजारी अशा लोकांची वस्ती होती. त्या लोकजीवनाने त्यांना मोहिनी घातली. आपल्या कलेला येथेच पोषक वातावरण असल्याची त्यांना खात्री झाली व  त्यातूनच त्यांच्यातील कलाकाराच्या उर्मी प्रदीप्त झाल्या. पुढे वयोवृद्ध पारधी स्त्रीचे काढलेले छायाचित्र त्यांनी इंग्लंडच्या जागतिक स्पर्धेसाठी पाठविले. त्यास द्वितीय क्रमांकाचे पारितोषिकही मिळाले होते. लंडनला जाण्यासाठीची त्यांच्या मनातील घालमेल त्यांच्या आईनेही ओळखली होतीच. आईच्या होकाराने ते खूपच आनंदी झाले व 1935 मध्ये त्यांनी लंडनला प्रयाण केले. तेथे त्यांनी ‘द बेनेट कॉलेज ऑफ शेफिल्ड’ मध्ये प्रवेश घेतला. चार वर्षांतच त्यांनी ‘कमर्शियल आर्ट डिप्लोमा’ यशस्वीपणे पूर्ण केला. त्याचवेळी जागतिक दर्जाच्या फोटोग्राफी स्पर्धेत भाग घेऊन त्यांनी दोन वेळा प्रथम येण्याचा बहुमानही मिळविला. लंडनमध्ये असतानाच जगप्रसिद्ध छायाचित्रकार म्हणून ते नावारूपाला आले. लंडनचे नागरिक त्यांना ‘गोल्डन मॅन केकी’ म्हणू लागले. त्यानंतर त्यांनी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जपान आदी राष्ट्रांचा दौरा केला. त्या-त्या देशातील कला जाणून घेतल्या. अनेक छायाचित्रे काढली आणि 1939 च्या अखेरीस हिंदुस्थानात परत आले. आल्या आल्या त्यांनी थेट चाळीसगावच गाठले आणि तेथेच एका बंगल्यात कलेची निस्सीम साधना करण्यासाठी सुमारे 50 वर्षे त्यांनी स्वतःला बंदिस्त करून घेतले.

केकींकडे अनेक कला होत्या. ते उत्कृष्ट छायाचित्रकार तर होतेच, शिवाय वॉटर कलर प्रिंटिंग, ऑईल कलर प्रिंटिंग, क्ले मॉडलिंग, ट्रिक फोटोग्राफी, वूड कार्विंग, ओरोगामी, शिल्पकला, काष्ठ शिल्पकला, स्केचिंग, मूर्तिकला इत्यादी कलेच्या सर्वच प्रांतात त्यांना गती होती.

केकींनी टेबलटॉप, स्टील लाईफ, पशुपक्षी या प्रकारची छायाचित्रे  विशेष अग्रक्रमाने व आवडीने टिपली आहेत. यात टेबलटॉप प्रकारातील त्यांची छायाचित्रे अधिक गाजली. विविध घटकांची कलात्मक मांडणी करून एखादा विषय किंवा आशय त्यातून अभिव्यक्त करण्याचा हा कलाप्रकार चित्राइतकाच सर्जनात्मक आहे. त्यांच्या टेबलटॉपमधील विषय दैनंदिन जीवनाशी संबंधित असून केवळ आणि  केवळ निर्भेळ आनंद हाच त्यामागील त्यांचा उद्देश आहे. त्यामुळेच त्यांच्या कोणत्याही छायाचित्रात दुःख किंवा उदासीनतेचा यत्किंचितही भाव नाही. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या निवासस्थानाला ‘केकी मूस दालन’ असे नाव देऊन तेथे त्यांचे स्मारक बनविण्यात आले आहे. त्यात सुमारे 1500 दुर्मिळ कलाकृतींचे जतन केलेले आहे. त्यासाठी ‘कलामहर्षी केकी मूस प्रतिष्ठान’ स्थापन केली असून, विद्यमान अध्यक्ष भी. ज. गायकवाड तर सचिव कमलाकर सामंत हे त्याचे सध्या काम पाहात आहेत. प्रतिष्ठानतर्फे नव्या तीन मजली कलादालनाचे काम सुरू आहे. या दालनाची मुख्य इमारत सुमारे 100 वर्षे जुनी आहे. त्यात तीन नवीन कलादालने साकारण्याचे नियोजन असून, दुसऱ्या भागात एलईडी स्क्रीनवर मूस यांचा जीवनपट पाहण्याची व्यवस्था करण्यात येईल. याच भागात नवोदित कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन मांडण्याची व्यवस्था असेल, तर तिसऱ्या भागाला ‘पखवाज कला दालन’ असे नाव असेल. त्यात नामवंत कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन, कार्यशाळा यासाठी जागा उपलब्ध असेल. कलेचा असा विशाल व अनमोल खजिना चाळीसगाव नगरवासीयांकडे निरपेक्षवृत्तीने सोपवून केकींनी जगाचा निरोप घेतला आणि चाळीसगावला जगाच्या नकाशावर नेऊन ठेवून चाळीसगावच्या ऋणातून मुक्त होण्याचा प्रयत्नही केला. केकींच्या इच्छेनुसार त्यांच्या निवासस्थानाच्या आवारातच त्यांचे दफन करण्यात आले आहे आणि त्यांच्या समाधीवर प्रसिद्ध शिल्पकार राम सुतार यांनी केकींचे अर्धपुतळे तयार केले आहेत. एखाद्या ग्रीक तत्त्ववेत्त्यासारखे दिसणारे हे पुतळे नवोदित कलाकारांना जणू संदेश देत आहेत की, जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर यशाला नेहमी खिशात ठेवा, डोक्यात नव्हे!