
>> प्र. ह. दलाल
भाषेमागे संस्कृती असते. उदा. ‘भीमटोला मारला’ यातला ‘भीम’ मराठी मुलांना ज्ञात असतो, पण ‘पॉवर ऑफ हर्क्युलस’ सांगितलं तर आधी ‘हर्क्युलस’ कोण, कसा हे सांगावं लागतं. ‘इसफिगस’ म्हटलं तर त्याला लवकर कळत नाही, पण ‘अन्ननलिका म्हटलं तर लागलीच लक्षात येते. कारण त्याला ‘अन्न’ माहीत असते आणि ‘नलिका’ही माहीत असते. इंग्रजी माध्यमाने संस्कार, संस्कृतीचीही नाळ तुटू लागली. दैनंदिन जीवनात बोलताना गरज नसतानाही इंग्रजी शब्दांचे ठिगळ लावल्याशिवाय आम्हाला होतच नाही; नव्हे ते आमच्या प्रतिष्ठेचे लक्षण ठरते. अजूनही इंग्रजांच्या मानसिक व वैचारिक गुलामगिरीतून आपण स्वतंत्र झालेलो नाही हेच खरे.
वर्तमानपत्रातील ‘त्या’ बातमीने माझ्या मनात अनेक विचारतरंग निर्माण झालेत. त्या बातमीत म्हटलं होतं की, सर्व सोपस्कार पूर्ण करूनही सुमारे 9000 मराठी शाळांच्या मान्यतेचे प्रस्ताव अनेक वर्षांपासून शासनदरबारी धूळ खात पडले आहेत. मात्र इंग्रजी शाळांच्या बाबतीत ‘अर्ज करा आणि शाळा घ्या’ इतके उदार धोरण शासनाने स्वीकारले आहे. मराठी शाळांच्या मान्यतेसाठी तीव्र आंदोलन उभारण्याचा इशाराही त्या बातमीत होता. महाराष्ट्राच्या सुवर्णमहोत्सवी वर्षातच आणि मराठी राजभाषा असूनही मराठी माध्यमांच्या शाळांसाठी लढा उभारावा लागतो हा केवढा दैवदुर्विलास म्हणावा!
आज दुर्दैवाने पालकांनाच आपल्या मुलांना मराठी माध्यमातून शिकविण्याबाबत उत्साह नाही. अभिजन वर्गाने अवलंबलेले इंग्रजी माध्यमाचे अंधानुकरण, मराठी शाळांच्या दर्जा व गुणवत्तेसंदर्भात निर्माण झालेली साशंकता, शासनाच्या उदासीन धोरणामुळे मराठीच्या व्यावहारिक उपयोजितेवर निर्माण झालेले प्रश्नचिन्ह, सद्यस्थितीत संगणक, विज्ञान-तंत्रज्ञानाची भाषा म्हणून मराठीला असलेल्या मर्यादा, इंग्रजीतून शिकण्याबाबत पालकांचा बुद्धिभ्रम, इंग्रजी शाळांच्या बाह्य चकाचक रंगरूपामुळे निर्माण झालेले आकर्षण, इंग्रजी माध्यमातून शिकणे म्हणजे ‘स्टेटस सिम्बॉल’, गरीब लोकच मुलांना मराठी माध्यमातून शिकवितात ही लोकप्रिय अफवा आणि स्पर्धेसाठी इंग्रजीच हवी हा गैरसमज इ. कारणांनी मराठी माध्यमालाच घरघर लागली असताना शासनाने त्यावर उपाययोजना करायचे सोडून शासनच मराठी माध्यमाच्या शाळांची गळचेपी करण्याचे धोरण स्वीकारताना स्पष्ट जाणवते.
व्यक्तिमत्त्वाच्या वेलीवर उमललेल्या सुंदर फुलांना मातृभाषा हाच जीवनरस आहे. माणसाचा मनःपिंड हा मातृभाषेच्या रसायनातूनच घडविला जातो. अंतःकरणातील भावनांचा प्रामाणिक उद्रेक होतो तोही मातृभाषेतूनच! म्हणूनच तर मातृभाषेला हृदयाची भाषा म्हणतात. मूल विचार करू लागते ते मातृभाषेच्याच आधारे. त्याच्या बुद्धीचा व आकलनशकतीचा विकासही मातृभाषेच्याच साहचर्याने होतो. त्याचे भावनात्मक व सांस्कृतिक जीवनही मातृभाषाच संपन्न करते. मानसशास्त्रज्ञांच्या मतेही माणूस मातृभाषेशिवाय सखोल सर्वांगीण विचार करूच शकत नाही. विचार करणे म्हणजे मनोमय बोलणेच होय (Thinking is a silent speech). शब्द हे कल्पनांचे प्रतीक व वाहक असतात व या शब्दांच्याच सहाय्याने मनुष्य हा अमूर्त पातळीवर विचार करू शकतो. भाषाप्रभुत्व, शब्दसंपदा हा बुद्धीचाच एक भाग मानला जातो. मानवी जीवनातील भाषेचे हे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेऊनच असे म्हणतात की, भाषा ही मानवाने निर्माण केले असेलही, परंतु आजचे सुशिक्षित, सुसंस्कृत व विकसित मानव हा भाषेनेच निर्माण केला आहे.
मराठी माध्यमातून शिक्षण घेतले तर उच्च शिक्षणात इंग्रजीतून अभ्यास जमणार नाही हाही एक गैरसमजच आहे. उलट माध्यमिक शिक्षणापर्यंत मुलांना इंग्रजी नीट समजत नाही. इंग्रजीतून विषयाचे सखोल ज्ञान संपादणे, नवनवीन कल्पना आत्मसात करून प्रकट करणे हे फार अवघड जाते. परिणामतः शिक्षकांनी लिहून दिलेल्या टिपणांवर व सोप्या भाषेत थोडक्यात लिहिलेल्या उत्तरांच्या धोकंपट्टीवरच त्यांची सर्व मदार अवलंबून असते. विद्यार्थी ज्ञानार्थी न होता परिक्षार्थी बनतात. अर्थपूर्ण आकलनाचा अभाव, अपूर्ण ज्ञान, अस्पष्ट संबोध यामुळे पुढे उच्च शिक्षणात त्यांच्या नशिबी अपयश व नैराश्यच येते. याउलट प्राथमिक व माध्यमिक स्तरावर केलेल्या मातृभाषेतून अध्ययनामुळे विषयज्ञान, संबोध परिपक्व होतात व या पायावरच पुढील उच्च शिक्षणाची इमारत चांगली बांधली जाऊ शकते. इंग्रजीत फक्त घटवणं आणि रटवणंच होतं. तसेच घरी मराठी व शाळेत इंग्रजी यामुळे मुलांची भावनिक व बौद्धिक घुसमटच अधिक होते. म्हणूनच जगातील सर्वच प्राचीन व अर्वाचीन शिक्षण तज्ञांनी शिक्षणाचे माध्यम मातृभाषाच म्हटले आहे.
एका सामाजिक संस्थेत मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई येथील नामांकित 142 शाळांतील 32 हजार विद्यार्थ्यांची एक चाचणी घेण्यात आली. हे सर्व विद्यार्थी इंग्रजी माध्यमातून इ. 5वी ते 7वी या वर्गातील आहेत. या चाचणीत असे निष्कर्ष निघाले की, या विद्यार्थ्यांचे विषयज्ञान हे वरवरचे असून ते केवळ पाठांतरावरच अवलंबून आहे. त्यांच्या अभिव्यक्तीतही त्रोटकपणा आहे. याप्रमाणेच पुण्याच्या माध्यमिक शिक्षण मंडळानेही काही वर्षांपूर्वी एक संशोधन केले होते. माध्यमिक शिक्षणात विज्ञान शाखेच्या अभ्यासक्रमासाठी मराठी माध्यम घेतलेल्या विद्यार्थ्यांचा व इंग्रजी माध्यम घेतलेल्या मुलांचा महाविद्यालयीन काळातील विज्ञान विषयातील प्रगतीचा तौलनिक आढावा घेतला. त्यात माध्यमिक शाळेत मराठी माध्यम घेतलेल्या मुलांनी इंग्रजी माध्यमातल्या मुलांपेक्षा अधिक प्रगती केल्याचे निष्कर्ष निघाले होते.
भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे
कुसुमाग्रजांच्या स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवात ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ या गाजलेल्या कवितेत म्हटले आहे –
‘‘भाषा मरता, देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे,
गुलाम आणिक होऊन आपुल्या प्रगतीचे शिर कापू नका.’’
भाषेमागे संस्कृती असते. उदा. ‘भीमटोला मारला’ यातला ‘भीम’ मराठी मुलांना ज्ञात असतो, पण ‘पॉवर ऑफ हर्क्युलस’ सांगितलं तर आधी ‘हर्क्युलस’ कोण, कसा हे सांगावं लागतं. ‘इसफिगस’ म्हटलं तर त्याला लवकर कळत नाही, पण ‘अन्ननलिका म्हटलं तर लागलीच लक्षात येते. कारण त्याला ‘अन्न’ माहीत असते आणि ‘नलिका’ही माहीत असते. इंग्रजी माध्यमाने संस्कार, संस्कृतीचीही नाळ तुटू लागली. दैनंदिन जीवनात बोलताना गरज नसतानाही इंग्रजी शब्दांचे ठिगळ लावल्याशिवाय आम्हाला होतच नाही; नव्हे ते आमच्या प्रतिष्ठsचे लक्षण ठरते. अजूनही इंग्रजांच्या मानसिक व वैचारिक गुलामगिरीतून आपण स्वतंत्र झालेलो नाही हेच खरे. आपल्या सर्व समस्यांचे मूळ आपल्या स्वतःविषयीच्या न्यूनगंडात सामावले आहे. देशाला बांधणाऱ्या दृष्य साखळदंडापेक्षाही मनाला बांधणारे हे अदृष्य साखळदंड अधिक भक्कम असतात.































































