ठसा – प्रा. विलास कुमठेकर

>> प्रशांत गौतम

नांदेड येथील सायन्स कॉलेजमधील इंग्रजीचे सेवानिवृत्त प्रा. विलास कुमठेकर यांचा कोरोनामुळे झालेला मृत्यू धक्कादायकच आहे. येत्या 12 मे रोजी ते अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करणार होते. तत्पूर्वीच नियतीने आपला डाव साधला. ते ज्यांना भेटत असत किंवा त्यांना कुणी भेटत असे, ती भेट खूप लक्षात राहणारी, संस्मरणीय असायची. ‘गॉड ब्लेस यू’ असे आशीर्वचनपर शब्द ते आपल्या संवादात हमखास वापरत असत. पुढे पुढे तीच त्यांच्या स्वभावाची ओळख बनून गेली. अजातशत्रू असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते, तर जीवनशैली सकारात्मक होती. सर्वांचे कल्याण होवो अशा त्यांच्या सदिच्छा असत. कोरोनामुळे आपण आपले अनेक मित्र, स्नेही गमावले. कोरोना कहराचा असा जीवघेणा फटका आपण गत वर्षभरापासून अनुभवतो आहोत. अफाट बुद्धिमत्ता असलेला हा मृदू स्वभावाचा अजातशत्रू चुटपुट लावून आता चिरंतनाच्या प्रवासाला गेला आहे. कर्करोगावर त्यांनी मात केली होती. ती कशी केली याचे अनुभव कथन त्यांनी आपल्या पुस्तकात केले. तसेच नांदेडच्या विद्यापीठाविषयी त्यांनी एक पुस्तक लिहिले. दोन्ही पुस्तके अप्रकाशितच राहिली. ती यथावकाश प्रकाशित होतीलच. कुमठेकर हयात असते तर 12 मेचा अमृत महोत्सवी समारंभही थाटात झाला असता, परंतु ते नियतीला बहुधा मान्य नसावे. कुमठेकर सायन्स कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक असले तरी महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राशी, लेखकांशी आणि संपादकांशी त्यांचा निकटचा स्नेह होता, नियमित संवाद होता. एवढेच नव्हे तर अनेक क्षेत्रांतील लोकांशी त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. रक्ताच्या कॅन्सरवर त्यांनी यशस्वी मात केली. मात्र कोरोनाच्या तडाख्यात त्यांचे निधन झाले. ते त्यांच्या परिवारासाठी अत्यंत क्लेशदायक आहे.

12 मे 1947 रोजी त्यांचा जन्म एका गरीब कुटुंबात झाला. मॅट्रिकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांच्या पायास गंभीर दुखापत झाली. अशाही प्रतिकूल परिस्थितीत विलासरावांनी शिक्षणाचा ध्यास घेत ते पूर्ण केले. बी. एडपर्यंतचे शिक्षण लातूरच्या महर्षी दयानंद महाविद्यालयात पूर्ण केले. पुढील काळात त्यांना डॉ. ना. य. डोळे यांच्यासारखे गुरू लाभले. इंग्रजी विषयाचे तर ते गाढे अभ्यासक होते. राज्यशास्त्र्ा, पॉलिटिकल सायन्स यात त्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. वीस-पंचवीस विषयांत इंग्रजीतून संशोधन केले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘इंग्रजी अध्यापनाबद्दल विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन’ या विषयावर अवघ्या नऊ दिवसांत 400 पानी प्रबंध लिहिला व तो स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठामध्ये सादर केला. 1992 साली त्यांना पीएच.डी. प्राप्त झाली. पायाच्या दुखण्यावर मात करीत त्यांनी हा शैक्षणिक प्रवास पूर्ण केला. कुमठेकर हे विद्यार्थीप्रिय प्राध्यापक होते. अनेकांच्या जडणघडणीत त्यांचा सहभाग राहिला. त्यांचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रांत मोठमोठय़ा पदांवर कार्यरत आहेत. विविध दैनिकांत, मासिकांत, त्यांनी विपुल प्रमाणात लेखन केले. विविध दैनिकांत, मासिकांत त्यांचे विपुल प्रमाणात लेखन प्रसिद्ध झाले. विशेष म्हणजे त्यांच्या संशोधनात्मक लेखांना केंब्रिज विद्यापीठातून मागणी असायची. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना मुलाखतीच्या माध्यमातून बोलतं करणे ही एक त्यांची आवड. सोलापूर, परभणी, नांदेड, संभाजीनगर, गुलबर्गा अशा आकाशवाणी केंद्रांवरून कुमठेकर यांनी मुलाखती घेतल्या. क्षेत्र कोणतेही असो, तिथे सकारात्मकता ठेवली की संपर्क, मित्रपरिवार हा सातत्याने वाढत जातो. साहित्याच्या क्षेत्रात कुण्या लेखकाने नव्याने काही लिहिले तर कुमठेकर यांना खूप अप्रूप असायचे. नव्या साहित्य निर्मितीचे स्वागत करणे ही कुमठेकरांची सप्रवृत्ती होती. सर्वांबद्दल सद्भावना तर होतीच. काम करणाऱया लोकांना प्रेरणा देणे, भरभरून कौतुक करणे, त्यांनी त्यांच्या क्षेत्रात भरीव प्रगती करावी यासाठी प्रेरणा देण्यासाठी मन हे मोठं असायला हवं. सदासर्वदा संकुचित प्रवृत्ती असेल तर समोरचा नाउमेद होतो. विलास कुमठेकर त्याला अपवाद होते. ‘परस्परांबद्दलची आत्मीयता त्यांनी रुजवली. मृदू व गोड स्वभावाने तर त्यांनी विद्यार्थ्यांच्या मनात प्रेम निर्माण केले. एवढेच नव्हे तर कितीतरी स्नेहीजनांनाही त्यांनी आपलेसे केले. कुमठेकर हे इंग्रजी विषयाचे प्राध्यापक. विषयाचा गाढा अभ्यास असल्याने ते आपला विषय समरस होऊन शिकवायचे. ते इंग्रजी कविता फार उत्तम शिकवत असत असे त्यांचे त्या विषयाचे अनेक विद्यार्थी सांगत असत. अनंत राऊत आपल्या लेखात म्हणतात, ‘‘ब्लड कॅन्सरमधून बाहेर आलेल्या कुमठेकरांची प्रकृती ठणठणीत होती. त्यामुळे ते आता बरीच वर्षे छान, आनंदात जगणार असे वाटत असतानाच थेट निधनाची बातमी आली व मन सुन्न झाले’’. खरेच आहे, कुमठेकर यांचे अचानक जाणे हे धक्कादायकच म्हणावे लागेल.

आपली प्रतिक्रिया द्या