
>> दिलीप जोशी
नव्वदी पार केलेले एक ज्येष्ठ मित्र त्यांच्या जीवनाचं सहजसूत्र सांगत होते, ‘‘काही नाही… आयुष्यभर भरपूर काम केलं आणि भरपूर आराम केला.’’ एकाच वेळी हे कसं शक्य झालं? तर ते म्हणाले, सुरुवातीपासूनच एक जीवनशैली ठरवली. काम करण्याचा वेळ आणि झोपेचे तास यांचं गणित जमवलं. ते आयुष्यभर पाळलं. अगदी परदेशात गेलो तेव्हासुद्धा. त्याशिवाय खाण्यापिण्यावर थोडा ताबा ठेवला आणि जमेल तितका व्यायाम केला. आता यातल्या नेमक्या किती गोष्टी आपण ‘फॉलो’ करतो हे आम्ही इतर उपस्थितांनी मनाशी आपसूकच ताडून पाहिलं आणि लक्षात आलं की, आपल्याला पुरेसा आराम मिळत नाही आणि हाती घेतलेलं कामही धड होत नाही. उगीच चिडचिड, टेन्शन असं काहीतरी घडतंय. त्यांनी आणखी एक सांगितलं होतं ते म्हणजे आपलं ‘बॉडी क्लॉक’ (जैविक घड्याळ) लक्षात घेऊन कामाची आखणी करायची. हे मात्र त्यांनाच शक्य होतं. कारण ते स्वतंत्र व्यावसायिक होते आणि आम्ही नोकरदार.
अमुक एक ट्रेन पकडून ‘कामावर’ जाणारी मंडळी. त्यांची रोज सकाळची लगबग लहानपणापासून बघितली. हळूहळू आम्ही त्यात सामील झालो. हा काळ एकोणीसशे साठ ते ऐंशीच्या दशकातला. त्यातले बरेचसे ‘बाबू’ सकाळी नऊ ते पाच या ‘ऑफिस टाइम’मध्ये काम करायचे. त्यावेळी अर्धीअधिक मुंबई मिलमध्ये काम करणाऱ्यांच्या कामगारांची. त्यांना मात्र शिफ्ट किंवा दिवसपाळी, रात्रपाळी असायची. पुढे उद्योगीकरण वाढीला लागलं आणि त्या त्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार कामाचे तास ठरू लागले. आमच्या पत्रकारितेच्या क्षेत्रात तर कामाचे ‘तास’ लवचिक असले तरी सतत सजग राहण्याचा ‘ऑल टाइम’ जॉब होता. महत्त्वाच्या घडामोडी घडल्या तर सणासुदीचा विचार न करता ‘कामावर’ जाण्यात एक कर्तव्यपूर्ती असायची.
सारं जग जेव्हा शेती करत होतं किंवा छोटे व्यवसाय घरातच होते तेव्हा ‘इतर कुठे कामावर’ जायची वेळच येत नव्हती. आपलं घर, आपलं वावर किंवा छोटा व्यवसायसुद्धा घराच्या आवारात असायचा. युरोपातल्या औद्योगिक क्रांतीने आणि युरोपीय शिस्तीने नोकरदारांची वेळ ठरली. घड्याळं आल्यावर त्याच्या काट्यावर कार्यकाल मोजला जाऊ लागला. पुढे तर हाती घेतलेलं काम किती काळात पूर्ण झालं आणि किती तास भरले याचे हिशेब ठेवले जाऊ लागले. वेतनाची वाटणी त्यावर ठरत गेली.
बदलत्या काळात हे अपरिहार्यच होतं. एकोणीसशे नव्वदपासून जगात इन्फर्मेशन-टेक्नॉलॉजीचा झपाट्याने प्रसार झाला. कॉम्प्युटरवर वेगानं कामं होऊ लागली. पुढचा टप्पा होता ‘आऊटसोर्सिंग’चा. जगाच्या पाठीवर कुठेही राहून, कुठलंही काम करता येणं शक्य झालं. मग युरोप, अमेरिकेतली सकाळची कामं इथल्या रात्री होऊ लागली. सतत नाईट शिफ्ट करणारा एक तरुण सांगत होता. आता सवय झालीय, पण शांत झोप झाली असं वाटत नाही. ती कसर (त्याच्या भाषेत बॅकलॉग) विकेण्डला भरून काढावी लागते.
या बदलत्या जीवनशैलीचा मानवी जीवनावर कोणता परिणाम होतो याचा अभ्यासही सुरू झालाय. दिवस उजाडल्यावर काम आणि संध्याकाळनंतर आराम ही प्राणिमात्रांची काम-आरामाची समान पद्धत. त्याला घुबडांसारखे निशाचर हे अपवाद. म्हणून रात्री जागून काम करणाऱ्यांना (किंवा अगदी नेटवर तासन्तास घालवणाऱ्यांना) इंग्लिशमध्ये ‘नाइट आऊल्स’ म्हटलं जातं. काही जणांना लवकर जाग येते तर काहींना जागरण झेपतं हा या जीवनशैलीचा आणखी एक पाठभेद. याचाच अधिक अभ्यास करून एका जर्मन कंपनीने एक सर्व्हे केला आणि लवकर जाग येणाऱ्यांचे कामाचे तास सूर्योदयानंतर लगेच सुरू केले आणि ‘नाइट आऊल्स’ना सायंकाळनंतर काम दिलं. परिणामी सर्वांची कार्यक्षमता, कंपनीचे उत्पादन आणि कामगारांचे आरोग्यही सुधारले.
शेवटी माणूस ‘कमावतो’ कशासाठी? सुखासाठीच, पण कामाच्या धबडग्यात धड आराम मिळत नसेल आणि प्रकृतीवर सतत ताण पडत असेल तर ते ‘केवढय़ाला’ पडेल? असा प्रश्न जरी मनात आला तरी प्रत्येकाला लगेच काही आपली नोकरी किंवा काम बदलता येणं शक्य नाही. आपापलं ‘बायोक्लॉक’ लक्षात घेऊन त्यातल्या त्यात सुखमय जीवनशैली कशी विकसित करता येईल हे ठरवावं लागेल. सध्या जगात ‘काम’ करणाऱ्या लोकांपैकी सुमारे 80 टक्के लोकांचं ‘बायोक्लॉक’ त्यांच्या कामाशी जुळत नाही असं म्हटलं जातं. अफाट काम करणाऱ्या ‘वर्कोहोलिक’ जगाला यावर कधी ना कधी विचार करावाच लागेल. तो आताच सुरू झालाय.
नैसर्गिकरीत्या ‘जागरण’ सोसतं त्यांना दिवसा काम करून त्रास होतो आणि सर्वसाधारण लोकांना ‘जागरणा’ने अस्वस्थता येते. यावर आता अभ्यास चाललाय. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ हे सूत्र जगाला कळू लागलंय. त्यांच्या ‘प्रकृती’नुसार काम दिलं तर ते मजेत आणि चांगलं होतं असं जाणवतंय. अर्थात प्रत्येकाची सोयीची वेळ पाहून तर काही कामावर जाता येणार नाही, पण वाढत्या ताणतणावापासून मुक्त असं जीवन जगण्याचा आणि कामही व्यवस्थित होण्याचा मार्ग सापडला तर जग समाधानी होईल. भरपूर काम आणि आरामही या सूत्राची अंमलबजावणी केल्यासारखंच ते असेल. यातून ‘सर्वेः सुखिनः सन्तु’ एवढंच आता म्हणता येईल.































































