शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर भ्याड हल्ला; संशयितांना अटक करण्याची महाविकास आघाडीची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण शहरातील घरावर बुधवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला. या हल्ल्यानंतर शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते संतप्त झाले आहेत. महाविकास आघाडीचे सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात ठाण मांडून भास्कर जाधव यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा जाब विचारत संशयितांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. शिवसेना नेते आमदार भास्कर जाधव यांची सुरक्षा काढून घेतल्याचाही निषेध करण्यात आला. तात्काळ त्यांना सुरक्षा व्यवस्था पुरवा, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

चिपळूण शहरातील पाग येथील शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरावर मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या घराच्या आवारात पेट्रोलच्या बाटल्या, दगड, स्टम्प फेकलेले आढळून आले आहेत. या घटनेनंतर बुधवारी सकाळी शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मंडळी आणि कार्यकर्ते यांनी चिपळूण पोलीस ठाण्यात जाऊन हल्ल्याचा जाब विचारला. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालुकाप्रमुख विनोद झगडे, संदीप सावंत, क्षेत्रप्रमुख बाळा कदम, माजी जि.प. अध्यक्ष विक्रांत जाधव, मिलींद कापड़ी, शौकत मुकादम, चित्रा वाघ, लियाकत शहा यांच्यासह शिवसैनिक आणि महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. यावेळी संशयित व्यक्तींची नावे देत यांना तात्काळ अटक करा, अशी मागणी शिवसेनेने केली. तसेच आमदार भास्कर जाधव यांना पुन्हा सुरक्षा द्या, अशीही मागणी यावेळी त्यांनी केली.

भास्कर जाधवांच्या घरावरील हल्ल्याची चौकशी झाली पाहिजे, आदित्य ठाकरे यांची मागणी

शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून शिवसेना नेते भास्कर जाधव व माजी खासदार निलेश राणे हे सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. सोमवारी चिपळूण येथील भाजपच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात निलेश राणे यांनी जाधव यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी कुडाळ येथे आमदार भास्कर जाधव यांनी जाहीर सभेत राणे पितापुत्रांचा चांगलाच समाचार घेतला होता. त्यानंतर प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी जाधव यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला. त्यातच बुधवारी मध्यरात्री जाधव यांच्या बंगल्यावर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. जाधव यांच्या घराच्या आवारात दगड, पेट्रोलच्या बाटल्या व स्टम्प आढळल्या. या घटनेमुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहेत.

पोलिसांचे दुर्लक्ष – विक्रांत जाधव
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विक्रांत जाधव यांनी पत्रकारांना सांगितले की, वातावरणाचा अंदाज आल्यानंतर काहीतरी घडणार याची आम्हाला जाणीव होती. त्यामुळे भास्कर जाधव यांचे स्वीय सहाय्यक तांदळे यांनी पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांना आठसाडे आठच्या दरम्यान फोन करून सांगितले होते की, सध्याची परिस्थिती बघून भास्कर जाधव यांच्या बंगल्याला आणि कार्यालयाला पोलीस सुरक्षा द्यावी लागेल. मात्र, रात्री साडेअकरा वाजता आमदार भास्कर जाधव यांना दिलेली सुरक्षा व्यवस्था काढण्यात आली. आपण स्वतः आमच्या घराबाहेर जे पोलीस कॉन्स्टेबल होते त्यांना आज रात्री तुम्हाला थांबावे लागेल असे सांगितले. मात्र त्यांनी आम्हाला पोलीस निरिक्षक रवींद्र शिंदे यांचा इथून जाण्याचा निरोप आहे, असे सांगितले. त्यानंतर माझ्या विनंतीवरुन ते काही काळ थांबले. मात्र रात्री एकच्या सुमारास दोघेही घरातून बाहेर निघून गेले आणि रात्री दोन अडीच वाजण्याच्या सुमारास हल्ला झाला. आता अशी परिस्थिती आहे की, ज्या घराला संरक्षण द्यायचे होते ते दिले गेले नाही. उलट भाजपच्या कार्यालयाला दहाबारा पोलीसांचे संरक्षण देण्यात आले आहे.