
चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मालमत्तेची चौकशी केली तर त्यांना विदेशात पळून जावे लागेल, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी लगावला. शिक्षकांवर ठरावीक उमेदवारालाच मतदान करण्यासाठी दबाव आणणाऱ्या शिक्षण संस्थांची एसआयटी चौकशी केली जाईल असे विधान बावनकुळे यांनी केले होते. त्याला सपकाळ यांनी हे प्रत्युत्तर दिले.
महसूल मंत्री बावनकुळे यांनी अमरावतीमध्ये बोलताना हे वक्तव्य केले होते. डॉ. पंजाबराव देशमुख यांनी शिक्षणाची कास धरून बहुजन समाजाला शिकवले आणि आपल्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणले. त्यांच्याच शिक्षण संस्थेमध्ये एसआयटी चौकशी लावणे हा संपूर्ण विदर्भाचा अपमान आहे, तो अपमान आपण सहन करायचा का? असा सवाल सपकाळ यांनी केला.
इतका पैसा आला कुठून?
शिवाजी शिक्षण संस्थेची एसआयटी चौकशी लावण्याची भाषा करणारे बावनकुळे विदेशात कोणत्या क्लबमध्ये जाऊन सुटकेस भरून भरून कोटय़वधी रुपये एक्का-दुरी खेळतात, इतका पैसा कुठून आला, असे सपकाळ म्हणाले.



























































