गुगल, यूटय़ूबवर जाहिरातींसाठी सर्वाधिक 102 कोटींचे पॅकेज; भाजप ठरला देशातील एकमेव राजकीय पक्ष

गुगल, यूटय़ुबवर जाहिरातींसाठी 100 कोटींहून अधिक रुपये खर्च करणारा भाजप हा देशातील पहिला राजकीय पक्ष ठरला आहे. मागील पाच वर्षांत भाजपच्या तब्बल 73 टक्के जाहिराती प्रकाशित झाल्या आहेत. गुगलच्या जाहिरात पारदर्शकता अहवालानुसार, 31 मे 2018 ते 25 एप्रिल 2024 पर्यंत भाजपने जाहिरातींवर तब्बल 102 कोटी रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे.

गेल्या 5 वर्षांत गुगलवर प्रकाशित झालेल्या जाहिरातींमध्ये भाजपचा वाटा जवळपास 26 टक्के आहे. या काळात 390 कोटी रुपयांच्या राजकीय जाहिराती प्रसिद्ध झाल्या आहेत. या कालावधीत एकूण 2.17 लाख ऑनलाइन जाहिराती देण्यात आल्या. यातील एकूण 1.61 लाख जाहिराती (73 टक्के) राजकीय जाहिरातींच्या श्रेणीतील भाजपच्या होत्या.

भाजपने कर्नाटकात सर्वाधिक 10.8 कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या आहेत. यानंतर, पक्षाने उत्तर प्रदेशसाठी 10.3 कोटी रुपये, राजस्थानसाठी 8.5 कोटी रुपये आणि दिल्लीसाठी 7.6 कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या आहेत. त्याच वेळी, लोकसभा निवडणुकीच्या 2024 च्या दुसऱया टप्प्यात (19 एप्रिल ते 25 एप्रिल) काँग्रेसने भाजपपेक्षा जास्त खर्च केला आहे. काँग्रेसने 5.7 कोटी रुपयांच्या, तर भाजपने 5.3 कोटी रुपयांच्या जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत.

दक्षिणेतील राज्यांत काँग्रेसच्या सर्वाधिक जाहिराती

दक्षिणेतील राज्यांत काँग्रेसने आतापर्यंत सर्वाधिक जाहिराती दिल्या आहेत. 5992 ऑनलाइन जाहिरातींसह काँग्रेस दुसऱया स्थानावर आहे. या जाहिरातींवर पक्षाने 45 कोटी रुपये खर्च केले आहेत. जे भाजपच्या जाहिरातीच्या केवळ 3.7 टक्के आहे. काँग्रेसची जाहिरात मोहीम प्रामुख्याने कर्नाटक आणि तेलंगणा (प्रत्येकी 9.6 कोटी रुपये खर्च) आणि मध्य प्रदेश (6.3 कोटी रुपये) वर केंद्रित होती.

विविध पक्षांच्या गुगलवरील जाहिरातींचा खर्च (कोटी रुपये)

                                 भाजप            102

                                 काँग्रेस           45

                                 डीएमके          45

                                 बीआरएस       12

                                 वायएसआरसीपी   7.3

                                 आप               1

                                 बीजेडी            3

                                 टीडीपी           2