लेखकाची व्यथा मांडणारा ‘ब्लॉक’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

एका लेखकाची व्यथा मांडणाऱ्या नीरज अवचट लिखित-दिग्दर्शित ‘ब्लॉक’ या लघुपटाची निवड मुंबई शॉर्ट इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये झाली आहे. येत्या रविवारी, 2 डिसेंबरला अंधेरीत या लघुपटाचे स्क्रिनिंग होणार आहे.

‘ब्लॉक’मध्ये एका नावाजलेल्या लेखकाची व्यथा मांडण्यात आली आहे. त्या लेखकाला एक पुस्तक लिहायचे असते. त्यासाठी त्याला दोन महिन्यांचा अवधी दिलेला असतो. परंतु नवीन काही सूचत नसल्यामुळे तो लेखक अधिकच तणावाखाली जातो.वारंवार डेडलाइन त्याला डोळय़ापुढे दिसू लागते. त्याचा राग त्याच्या कुटुंबीयांवर कशाप्रकारे निघतो? हे या 18 मिनिटांच्या सायकोलॉजीकल थ्रीलर शॉर्टफिल्मच्या माध्यमातून दाखवण्यात आले आहे. ताणतणावातही खचून न जाता डोके शांत ठेवा. योग्य निर्णय घ्या असा संदेश या माध्यमातून देण्यात आला आहे. कर्तव्य शर्मा आणि गौरांगी डँग हे कलाकार यात मुख्य भूमिकेत आहेत.

जय हिंद कॉलेजमधून बीएमएमची पदवी घेतलेल्या नीरज अवचट या तरुणाने या लघुपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. लाँस अँजलिसमध्येदेखील त्याने फिल्ममेकिंगचे धडे घेतले आहेत. म्युझिक व्हिडीओ, जाहिरातींसाठीही त्याने काम केले आहे.