नाशिकमधील तरुणाचे अपहरण, हत्या प्रकरण – आरोपींची मृत्युदंडाची शिक्षा उच्च न्यायालयाकडून रद्द, फाशीऐवजी ३० वर्षांची जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्ह्यातील २२ वर्षीय तरुणाचे अपहरण आणि मृत्यूप्रकरणी तुरुंगात शिक्षा भोगत असलेल्या दोघा आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने दोघा आरोपींची मृत्युदंडाची शिक्षा रद्द करत त्याऐवजी ३० वर्षांची जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. चेतन पगारे आणि अमन जाट अशी त्या दोघा आरोपींची नावे आहेत.

निफाड तालुक्यातील ओझर येथील तरुण विपीन बाफना ८ जून २०१३ रोजी घराबाहेर गेला, मात्र तो घरी परतलाच नाही. ९ जून रोजी एका अज्ञात व्यक्तीने विपीनच्या मोबाईलवरून त्याच्या वडिलांना फोन करून त्याचे अपहरण झाल्याचे सांगितले आणि सुटकेसाठी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली. त्यानंतर विपीनशी कोणताही संपर्क झाला नाही. १४ जून २०१३ रोजी आडगाव परिसरातील शेतात विपीन यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी पाच जणांना अटक करून त्यांच्याविरुद्ध हत्या, अपहरण आणि ‘मकोका’अंतर्गत गुन्हे दाखल केले.

डिसेंबर २०२२ मध्ये नाशिकमधील विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश अदिती कदम यांनी पगारे आणि जाट यांना दोषी ठरवत मृत्युदंडाची शिक्षा सुनावली होती, तर अन्य तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. विशेष न्यायालयाने आपल्या निर्णयात नमूद केले होते की, मृत विपीन याचे आरोपींशी कोणतेही वैयक्तिक वैर नव्हते आणि त्याला ठार मारण्यासाठी कोणतेही ठोस कारण नव्हते. न्यायालयाने आरोपींची मानसिकता अत्यंत विकृत असल्याचे नमूद करत हा गुन्हा दुर्मिळातील दुर्मिळ प्रकारात मोडतो असे निरीक्षण नोंदवले होते. तसेच आरोपींमध्ये पश्चात्तापाची भावना नसल्याचे आणि सुधारणेची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले. आरोपींनी सत्र न्यायालयाने सुनावलेल्या या शिक्षेविरोधात हायकोर्टात अपील दाखल केले. त्यावर न्यायमूर्ती भारती डांगरे आणि मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. या अपिलावरील युक्तिवाद पूर्ण झाल्याने न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. खंडपीठाने आज गुरुवारी हा निकाल जाहीर केला.