बूस्टर डोस सर्व रोगांवर रामबाण; इस्रायलमधील संशोधनातील निष्कर्ष

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेऊन किमान पाच महिने उलटलेल्या व्यक्तींना तिसरा बूस्टर डोस दिल्यास तो सर्व रोगांवर रामबाण ठरतो, असे नुकत्याच झालेल्या संशोधनात दिसून आले आहे. ‘दि लॅन्सेट’मध्ये हा संशोधन अहवाल प्रकाशित झाला आहे. दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोनाची पुन्हा लागण होण्याची शक्यता बूस्टर डोसमुळे 93 टक्क्यांनी कमी होते असे त्यात म्हटले आहे.

इस्रायलमध्ये दि क्लॅलिट रिसर्च इन्स्टिटय़ूट आणि हार्वर्ड विद्यापीठातील तज्ञांनी हे संशोधन केले. लसीचा तिसरा डोस कोरोनाला कितपत रोखू शकतो याचा अंदाज त्यात घेण्यात आला. लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतरही अनेकांमध्ये कोरोनाची वेगवेगळी लक्षणे दिसून येत आहेत. ‘फायझर-बायोएनटेक’ लसीवर हे संशोधन करण्यात आले.

सात लाखांवर नागरिकांना दिला तिसरा डोस

30 जुलै ते 23 सप्टेंबर 2021 या कालावधीत हे संशोधन केले गेले. त्या कालावधीत इस्रायलमध्ये कोरोनाची चौथी लाट सुरू होती. डेल्टा व्हेरिएंटने थैमान घातले होते. संशोधनासाठी 12 वर्षांपासून पुढील वयोगटातील 7 लाख 28 हजार 321 नागरिकांना फायझर लसीचा बूस्टर डोस दिला गेला होता. त्यांच्या शरीरात झालेले बदल आणि दोन डोस घेतलेल्या तितक्याच नागरिकांच्या शरीरातील बदल यांचा अभ्यास केला गेला.

मृत्यूची शक्यताही 81 टक्क्यांनी कमी होते

या संशोधनाचे निष्कर्ष समाधानकारक दिसून आले. पाच महिन्यांपूर्वी दोन डोस घेतलेल्या नागरिकांपेक्षा तीन डोस घेतलेल्या नागरिकांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता 93 टक्क्यांनी कमी होते. कोरोनाची तीव्रता वाढण्याची शक्यता 92 टक्क्यांनी कमी होते आणि मृत्यूची शक्यता 81 टक्क्यांनी कमी होते असे निष्कर्ष दिसून आले. तिसऱया लसीचा परिणाम स्त्री आणि पुरुषांमध्ये, विविध वयोगटांमध्ये तसेच सहव्याधी व्यक्तींमध्ये वेगवेगळेही दिसून आले.