
मुंबई विद्यापीठाच्या ‘टीवायबीकॉम’च्या पेपरफुटीची ‘सीआयडी’ चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत तातडीने कारवाई करण्याचे निर्देश उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषदेत आज दिले. या पेपरफुटीबाबत शिवसेना आमदार ऍड. अनिल परब यांनी ‘सीआयडी’ चौकशीची मागणी केली होती, तर युवासेनेनेदेखील या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यासाठी पाठपुरावा केला होता.
मुंबई विद्यापीठाच्या ‘टीवायबीकॉम’ सत्र-6 परीक्षेमधील इकॉनॉमिक्स, कॉमर्स आणि डायरेक्ट टॅक्सेस पेपर-2 या तीन विषयांच्या एप्रिलच्या तिसऱ्या आठवडय़ात फुटल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबत विद्यापीठाने दोषींवर कोणती कारवाई केली, असा प्रश्न काँग्रेसचे भाई जगताप यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून उपस्थित केला. ‘नीट’सारख्या परीक्षेचा पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांना झालेल्या यावेळी शिवसेनेचे आमदार ऍड. अनिल परब यांनी या प्रकरणाला दुरस्थ व ऑनलाइन शिक्षण केंद्राचे संचालक सलगर हेच जबाबदार असल्याचे सांगितले. पेपर 15 एप्रिलला फुटले मग एफआयआर दाखल करायला 23 एप्रिल का उजाडला, असा सवालही त्यांनी केला. या प्रकरणात विद्यापीठाच्या ‘क’ व ‘ड’ दर्जाच्या तीन कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्यात आल्या तरी सलगर यांनी जाणीवपूर्वक केलेल्या दुर्लक्षामुळे पेपरफुटी झाल्याचे सांगितले.
मॅनेजमेंट कौन्सिलकडून कारवाई होणार
मुंबई विद्यापीठ स्वायत्त संस्था असल्यामुळे कोणता घोटाळा झाला तरी सरकार थेट हस्तक्षेप करत कारवाईचे आदेश देऊ शकत नाही. त्यामुळे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलने निर्णय घेऊन सीआयडी चौकशीबाबत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देशही पाटील यांनी विद्यापीठाला दिले.






























































