शिरूरच्या शिंदेवाडीत बैलगाडा शर्यतीदरम्यान हाणामारी; एकाचा मृत्यू

शिरूरच्या पश्चिमेकडील मलठणच्या शिंदेवाडी येथे रविवारी श्री खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यत सुरू असताना बैलगाडा घाटातच भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे व संजय रखमा शिंदे यांच्यात अचानक वादावादी होत हाणामारी झाली. त्यामुळे बैलगाडा शर्यती बंद करण्यात आल्या. या भांडणाचा बैलगाडा शर्यतीशी कुठलाही संबंध नसल्याचे यात्रा कमिटीकडून सांगण्यात आले आहे.

शिंदेवाडी येथील भाविकीतील दोन कुटुंबात ही हाणामारी झाली आहे. पुर्ववैमनस्यामुळे त्यांच्यात कायम शिवीगाळ आणि वादावादी होत होती. रविवारी घाटात झालेल्या हाणामारीत संजय रखमा शिंदे (वय 35) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर शिरूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी भानुदास ज्ञानोबा शिंदे, ज्ञानोबा गोविंद शिंदे यांच्यावर शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शिरुर पोलीस अधिक तपास करत आहेत.

शिरूरच्या बेट भागात सध्या गावोगावी यात्रा- जत्रा सुरू असून बैलगाडा शर्यत, तमाशा हे यात्रेचे मुख्य आकर्षण बनले आहे. बंद झालेल्या शर्यती सुरू झाल्यापासून बैलगाडाप्रेमी प्रत्येक यात्रेतील शर्यतीत सहभाग नोंदवत आहे. बेट भागातील टाकळी हाजी कुडांवरील मळगंगा देवीची सर्वात मोठी यात्रा भरते. ही यात्रा दोन दिवसावर आली असून प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे. किरकोळ वादावरून राग मनात ठेवून हाणामारी होत आहे. अशा प्रकारे तंटे, हाणामारी झाल्यास यात्रा बंद होवू शकते, त्या ठिकाणी पुन्हा बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळत नाही. यात्रा दरम्यान संवेदनशील गावांमध्ये अधिक पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी नागरीकांमधुन होत आहे.