
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन हा उपाय नाही. दुसरी लाट आली तरीही आपण खूप गाफील आहोत. लोकांनी स्वतःहून लॉकडाऊनसारखे निर्बंध पाळणे गरजेचे आहे. केरळमध्ये दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील लोकांनी मास्क, शारीरिक अंतर, गर्दी टाळणे असे कोरोनाचे नियम पाळले तर दोन-चार आठवडय़ांत कोरोनाची दुसरी लाट ओसरेल, असा विश्वास राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. शशांक जोशी यांनी व्यक्त केला.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट, वाढती रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनचे संकट, लसीकरणानंतरही कोरोनाची अनेकांना झालेली लागण यावर डॉ. शशांक जोशी यांनी त्यांची स्पष्ट मते मांडली.
दुसरा स्ट्रेन आला आणि…
गणेशोत्सवामध्ये कोरोना सर्वोच्च बिंदूवर होता. त्यामुळे दसरा दिवाळी, नवरात्र, नाताळच्या सणात अतिदक्षता घेतली. त्यानंतर नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी महिन्यात खूप व्यवस्थित सुरू होते. हळूहळू सर्व गोष्टी उघडल्या. विदर्भ, मराठवाडा भागातील लोक घरात बसले होते. त्या भागात कोविडचा प्रादुर्भाव नव्हता. अकोला, अमरावती भागात कोविडचा वेगळा स्ट्रेन आला त्या भागात कोविडची लागण सुरू झाली. तो बाहेरून आला आहे की स्थानिक आहे यावर दिल्ली व पुण्यातील शास्त्रज्ञ अभ्यास करतील. महिना-दोन महिन्यांत त्यावरचे उत्तरही मिळेल.
कोरोनाचे नियम पाळले नाहीत
आताचा कोरोना अधिक संसर्गजन्य आहे. पूर्वी एका घरात एखाद् दुसऱया व्यक्तीला कोरोनाची लागण होत होती, पण आता संपूर्ण कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची लागण होते. आपले समारंभ, सोहळे सुरू केले होते. कोरोनाचे सुरक्षा नियम पाळले नाहीत. दुर्दैवाने हा स्ट्रेन वेगळा आल्याने त्याची लागण त्या भागात झाली. मग पूर्ण महाराष्ट्रात पसरला.
झोपडपट्टीत सामूहिक रोगप्रतिकारशक्ती
मुंबईत सापडणाऱया केस धारावीसारख्या भागातून येत नाहीत. तर केस चांगल्या सोसायटी, उच्च मध्यमवर्गीय, मध्यमवर्गीयांतून आहेत. झोपडपट्टीसारख्या भागात सामूहिक रोगप्रतिकारशक्ती वाढली आहे. म्हणून धारावीत 100च्या वर केसेस झालेल्या नाहीत. मुंबईत लाट आली. सर्व रेकॉर्ड तोडले, पण तरीही धारावीत केस वाढल्या नाहीत.
कोविडचे ठोकताळे मांडणे कठीण
कोरोनाची दुसरी लाट ओसरण्यासाठी किती कालावधी लागेल हे सांगणे कठीण आहे. आतापर्यंतचे सर्व ठोकताळे कोविडने मोडून टाकले आहेत. दुसरी लाट येणार याची कल्पना होती, पण कधी येईल हे सांगता येणे कठीण होते. 26 डिसेंबर ते 26 जानेवारी या काळात दुसरी लाट येईल असा अंदाज वर्तविण्यात येत होता, पण ती दोन-तीन महिन्यांनी उशिरा आली आता बहुतांश लोक बरे होतात. पण संख्या अधिक असल्याने यंत्रणेवर ताण अधिक पडत आहे. लोकांनी सहकार्य केले, स्वतः जबाबदारी घेतली तर स्वतःला, राज्याला व देशाला फायदा होईल.
80 टक्के लक्षणविरहित
आपल्या आरोग्य यंत्रणेवर खूप ताण पडला तर शेवटचा उपाय म्हणजे लॉकडाऊन करावा लागतो. सध्या तरी 30 टक्के खाटा उपलब्ध आहेत. पण येणारे संभाव्य रुग्ण चांगल्या भागातील असल्याने चांगल्या हॉस्पिटलमध्ये जातात. सार्वजनिक रुग्णालयात जाण्यासाठी ते तयार नाहीत. दुसऱया लाटेतील स्ट्रेनमध्ये 80 टक्के लोकं लक्षणविरहित आहेत. कोरोनाची लागण झाली आहे ते त्यांना कळतच नाही. त्यामुळे ते दैनंदिन कामकाज सुरू ठेवतात. त्यांनी कामकाज थांबवून घरात बसणे अत्यंत आवश्यक आहे. हे लोक घरात बसत नाहीत त्यामुळे कोरोनाची झपाटय़ाने वाढ झाली आहे.
मुंबईत मायक्रो कंटेनमेंट झोन
राज्य सरकारने कठोर निर्बंध घातले आहेत ते जर पूर्णपणे पाळले तर मग हा कोविड काबूत येऊ शकतो. कित्येक जिह्यांमध्ये स्थानिक जिल्हाधिकाऱयांनी कोरोनाचे रुग्ण पाहून काही ठिकाणी लहान-मोठे लॉकडाऊन जाहीर केले आहेत. मुंबई मोठे शहर आहे. मुंबईत इमारती सील करणे, मायक्रो कंटेनमेंट झोन जाहीर करावे लागतील. मायक्रोकंटेनमेंट एकच हत्यार राहणार आहे.
45 च्या अगोदर लसीकरण
मुंबईत आता 45 च्या अगोदरच्या वयोगटातही लसीकरण केले तर फायदा होईल.
रॅपिड अँटिजन चाचणी
पहिल्या लसीकरणानंतर कोरोना होऊ शकतो. मात्र लसीकरणापूर्वी सर्दी-खोकल्याचा संशय आला तर मात्र रॅपिड अँटिजन चाचणी करूनच मग लस घ्या. वैद्यकीय सल्ल्याने लस घ्या.

































































