…तर पाकिस्तान उपांत्य फेरीत असता; इंग्लंडच्या मायकल वॉनने घेतली मोहम्मद हाफिजची फिरकी

आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेतून पाकिस्तान संघ बाहेर पडला आहे. पाकिस्तान बाहेर पडल्यापासून सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस पडत आहे. विराट कोहलीने शतक झळकावल्यानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू मोहम्मद हाफीजने विराटला स्वार्थी म्हटले होते. तेव्हापासून हाफिजला सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. इंग्लंडचा माजी क्रिकेटर मायकेल वॉननेही हाफिजची फिरकी घेतली आहे. आता पाकिस्तान वर्ल्डकपमधून बाहेर पडल्यानंतर मायकल वॉनने पुन्हा एकदा हाफिजवर निशाणा साधत त्याची खिल्ली उडवली आहे.

मायकल वॉनने एक्सवर हाफिजची फिरकी घेत ट्विट केले आहे. त्यात त्याने म्हटले आहे की, जर पाकिस्तानचे फलंदाजही विराट कोहलीसारखे थोडेसे स्वार्थी असते, तर बरे झाले असते. त्याचबरोबर या पोस्टमध्ये मायकल वॉनने मोहम्मद हाफिजला मेन्शन केले. अशा प्रकारे वॉनने विश्वचषकातून बाहेर झाल्यानंतर पाकिस्तानची खिल्ली उडवली आहे. मायकल वॉन म्हणाला, जर पाकिस्तानचे खेळाडू विराटसारखे थोडेसे स्वार्थी असते, तर पाकिस्तानला विश्वचषकातून बाहेर पडावे लागले नसते. इंग्लंडविरुद्धच्या विश्वचषक साखळी सामन्यात पराभूत होत पाकिस्तान संघ उपांत्य फेरीतून बाहेर पडला आहे.

विराट कोहलीने नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शतक झळकावले होते. विराटने 121 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या होत्या. त्यावर हाफीजने विराटला स्वार्थी म्हटले होते. तो म्हणाला की, कोहली संघाच्या गरजेपेक्षा वैयक्तिक कामगिरीला अधिक प्राधान्य देत आहे. त्यानंतर हाफीज सोशल मिडीयावर ट्रोल होत आहे. आता मायकल वॉलने ट्विट करत हाफीजची बोलतीच बंद केली आहे.