CWC 2023 हरणार त्याला रिटर्न तिकीट मिळणार, इंग्लंड आणि श्रीलंकेसाठी अखेरची संधी

जगज्जेता इंग्लंड आणि श्रीलंकेसाठी गुरुवारचा सामना अखेरची संधी आहे. तीन-तीन पराभवांमुळे दोन्ही संघाचे स्पर्धेतील आव्हानच संकटात सापडले आहे. चिन्नास्वामी स्टेडियमवर जो विजयाचे चुंबन घेणार तोच आव्हान कायम राखणार अन् जो हरणार त्याला मायदेशाचे रिटर्न तिकीट मिळणार हे निश्चित आहे.

प्रथमच जिंका नाहीतर बॅगा भरा असे म्हणण्याची वेळ जगज्जेत्यांवर आलीय. ‘ऍशेस’मध्ये आक्रमक खेळ करून अवघ्या जगाचे लक्ष वेधणाऱया इंग्लंडवर प्रारंभीच बाहेर होण्याची नामुष्की कशी ओढावली? प्रश्न बिकट आहे. खेळाडूंची भलीमोठी यादी पाहिली तर वर्ल्ड कपचा सर्वात बलाढय़ संघ म्हणून इंग्लंडचेच नाव पहिल्या क्रमांकावर होते, पण अहमदाबादच्या सलामीच्या लढतीपासूनच त्यांच्या मागे लागलेली पराभवाची साडेसाती पाठच सोडत नाहीय.

इंग्लंडच्या गोलंदाजीलाही नजर लागली आहे. त्यांचा सर्वात यशस्वी गोलंदाज रीस टॉपली हाताच्या दुखापतीमुळे अचानक स्पर्धेतून बाद झाला आहे. तसेच इतर एकाही गोलंदाजाला सूर न सापडल्यामुळे त्यांच्या संघातच नैराश्याचे वातावरण पसरले आहे. त्यांचे हे नैराश्य केवळ विजयच दूर करू शकतो.

फलंदाजांना आक्रमकतेचाच विसर

इंग्लंडच्या फलंदाजांकडून ज्या आक्रमकतेची अपेक्षा होती ती आक्रमकता अचानक दक्षिण आफ्रिकन फलंदाजांमध्ये शिरलीय, असेच वाटतेय. पण ती आक्रमकता इंग्लिश फलंदाज विसरले आहेत. डेव्हिड मलानची 140 धावांची खेळी वगळता एकाही फलंदाजाला शतकासमीप पोहोचता आलेले नाही. कर्णधार जोस बटलर, जॉनी बेअरस्टॉ, हॅरी ब्रुक यांचे अपयश संघाला मारक ठरतेय. तसेच बेन स्टोक्सची दुखापतही इंग्लिश संघाला फार महागात पडली आहे. स्टोक्सने आफ्रिकेविरुद्ध संघात पुनरागमन केले खरे पण ते त्याला फळले नाही. त्याला 5 धावाच करता आल्या. फलंदाजांच्या निराशाजनक खेळामुळे इंग्लंडची पहिल्या चार सामन्पांत वाताहत झालीय. उपांत्य फेरीत धडक मारण्याची अंधुक आशा श्रीलंकेविरुद्धचा विजय आहे. इथे त्यांची आक्रमकता दिसली नाही तर त्यांचे लंडन रिटर्न निश्चित समजायचे.

श्रीलंकाही खचलेली

पराभवाची हॅटट्रिक करणाऱया श्रीलंकेने नेदरलॅण्ड्सविरुद्ध विजय मिळवत आपल्या गुणांचे खाते उघडले, पण आता त्यांची गाठ त्यांच्यापेक्षा सरस असलेल्या संघाशी पडणार आहे. लंकेने विजय जरी मिळविला असला तरी त्यांच्या संघात चैतन्य संचारलेले नाही. सदिरा समरविक्रमा आणि कुसल मेंडिस यांनी शतके झळकावली आहेत. पथुम निस्सांकाने चार डावांत तीन अर्धशतके ठोकत फलंदाजीला बळ दिलेय, पण गोलंदाजीत दिलशान मदुशंकाव्यतिरिक्त एकही गोलंदाज आपला प्रभाव दाखवू शकलेला नाही. अशा बेभरवशाच्या खेळाडूंसह श्रीलंकेला विजयाचे लक्ष्य गाठणे कठीणच आहे. सध्या त्यांच्या संघात एकही जिगरबाज खेळाडू नसल्यामुळे हा जखमी संघ इंग्लंडविरुद्ध यश मिळविण्याची शक्यता कमीच आहे.