परळमधील डॉ. शिरोडकर मंडईचा होणार पुनर्विकास; ४८ मजली इमारत उभारणार पालिका खर्च करणार २९७ कोटी रुपये

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

परळ येथील मुंबई महापालिका क्षेत्रातील डॉ. शिरोडकर मंडईचा नव्याने पुनर्विकास करण्यात येणार असून त्याठिकाणी ४८ मजली इमारत उभारण्यात येणार आहे. त्यात मंडई, पार्किंग, सीसीटीव्ही कॅमेरे, फायर फायटिंग सिस्टम अशा अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत. या मंडईसाठी प्रशासनाकडून तब्बल २९७ कोटी ९२ लाख रुपये खर्च करणार आहे. बुधवार २४ जून रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत या प्रस्तावावर जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे.
परळ येथील जगन्नाथ भातणकर मार्गावरील डॉ. शिरोडकर मंडई मुंबई महापालिकेच्या मालकीची आहे.

परळ शिवडी विभाग धारण करणाऱ्या भूखंडाचा पुनर्विकास करून २१ मजल्याचे बांधकाम केले जाणार होते. त्या ठिकाणी महापालिका मंडई आणि कर्मचारी निवासस्थाने बांधण्यासाठी २०१८ मध्ये कंत्राटदाराची निवड करण्यात आली होती. डिसेंबर २०१८ पासून प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली. मात्र २०२३ मध्ये कंत्राटदाराने ते काम अर्धवट स्थितीत सोडून पळ काढला. त्यामुळे या अर्धवट राहिलेल्या प्रकल्पातील सद्यस्थितीतील २१ मजली इमारतीमधील उर्वरित कामे पूर्ण करणे व रिकाम्या भूखंडावर जुन्या इमारतीशी संलग्न नवी इमारत तळघरासह ४८ मजल्यांपर्यंत बांधकाम करण्यासाठी नव्याने कंत्राटदार नेमण्यात आला आहे.
निविदांमध्ये तीन कंपन्यांचा सहभाग
मंडईच्या नव्याने पुनर्विकासासाठी मागवलेल्या निविदांमध्ये तीन कंपन्यांनी भाग घेतला आहे. यामध्ये कुणाल-हिराणी ही संयुक्त भागीदारातील कंपनीची निवड करण्यात आली आहे. यामध्ये मूळ कंत्राट २३९.५० कोटी रुपये आणि विविध करांसह २९७.९२ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. कुणाल स्ट्रक्चर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने आजवर गांधीनगर, ओडिशा, भुवनेश्वर, दमण आदी ठिकाणी कामे केलेली आहेत.