चुकीला माफी नाही! ‘एशेस’ मालिका संपताच इंग्लंड-ऑस्ट्रेलियावर आयसीसीची मोठी कारवाई

ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील एशेस कसोटी मालिका नुकतीच संपली. 2-0 अशा पिछाडीनंतरही इंग्लंडने पुढील तिन्ही सामन्यात वर्चस्व राखत मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. गेली एशेस मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकल्याने यंदाची एशेस त्यांनीच राखली. मात्र ही मालिका संपताच दोन्ही संघांना आयसीसीने दणका दिला असून स्लो ओव्हर रेटमुळे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला दंड ठोठावला आहे.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा तिसरा हंगाम नुकताच सुरू झाला. गेल्या हंगामाच्या अंतिम लढतीत ऑस्ट्रेलियाने हिंदुस्थानचा पराभव करत जेतेपद पटकावले. तिसऱ्या हंगामापूर्वी आयसीसीने नियमांमध्ये काही बदल केले होते. त्यानुसार निर्धारित वेळेत षटकांची गती राखली न गेल्यास प्रत्येक षटकामागे सामना शुल्काच्या 5 टक्के रक्कम कापली जाईल. तसेच सामना शुल्कापैकी जास्तीत जास्त 50 टक्के रक्कम दंड म्हणून कापली जाईल. यासह एका षटकामागे एक गुण कापला जाईल असेही आयसीसीने स्पष्ट केले होते. या नविन नियमानुसार आयसीसीने कारवाई केली असून ऑस्ट्रेलियाचे 10, तर इंग्लंडचे 19 गुण कापले आहेत.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत सामना जिंकणाऱ्या संघाला 12 गुण, अनिर्णित राहिला तर दोन्ही संघांना प्रत्येकी 4 गुण दिले जातेत. यासह दिवसाला 90 षटकांची गोलंदाजी करणेही बंधनकारक आहे. मात्र एजबस्टन कसोटीमध्ये इंग्लंडने निर्धारित वेळेपेक्षा 2 षटकं कमी टाकली होती. लॉर्डस कसोटीत 9 षटके, ओल्ड ट्रॅफर्डमध्ये 3 आणि द ओव्हलमध्ये 5 षटके कमी टाकली होती. परिणाम इंग्लंडला 19 गुण गमवावे लागले. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने ओल्ड ट्रॅफर्ड कसोटीमध्ये 10 षटके कमी टाकली होती. त्यामुळे ऑस्ट्रेलियाला 10 गुण गमवावे लागले.


इंग्लंडने एशेस कसोटी मालिकेच्या माध्यमातून 28 गुणांची कमाई केली होती. मात्र स्लो ओव्हर रेटमुळे त्यांना 19 गुणांचा दंड बसला. यामुळे इंग्लंडला फक्त 9 गुण मिळाले. तर ऑस्ट्रेलियानेही 28 गुणांची कमाई केली होती आणि स्वो ओव्हर रेटमुळे त्यांचे 10 गुण कमी झाले. अशाप्रकारे ऑस्ट्रेलियाला 18 गुण मिळाले. यामुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 30 गुणांसह डब्ल्यूटीसी गुणतालिकेमध्ये पाकिस्तान आणि हिंदुस्थाननंतर तिसऱ्या स्थानावर पोहोचला, तर इंग्लंडचा संघ पाचव्या स्थानावर आहे.

दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने गुण तर गमावलेच शिवाय त्यांना सामना शुक्लाची रक्कमही दंड म्हणून द्यावी लागली. ओल्ड ट्रॅफर्डमध्ये स्वो ओव्हर रेटमुळे ऑस्ट्रेलियाला सामना शुक्लापैकी 50 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावी लागली. तर इंग्लंडला हिल्या कसोटीत 10 टक्के, दुसऱ्या कसोटीत 45 टक्के, चौथ्या कसोटीत 15 टक्के, तर पाचव्या कसोटीत 25 टक्के सामना शुल्काचा दंड भरावा लागला आहे.