
पुढील काळामध्ये मंदीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापासूनच जगभरात त्याचे परिणाम दिसू लागले आहेत. जगभरात विविध क्षेत्रातील दिग्गज कंपन्या कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहेत. अलीकडेच मायक्रोसॉफ्टने जवळपास 1000 कर्मचार्यांना कामावरून काढले आहे, तर रॉयल फिलिप्स कंपनीने 4000 लोकांना कामावरून काढून टाकण्याची घोषणा केली आहे. आता मेटाच्या मालकीचे फेसबुक देखील या यादीत समाविष्ट होण्याची शक्यता आहे.
मेटा शेअरहोल्डर अल्टिमीटर कॅपिटल मॅनेजमेंटने संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना एक खुले पत्र लिहिले आहे, ज्यामध्ये कंपनीने खर्चात कपात करण्याची मागणी केली आहे. या कंपनीने किमान 20% कर्मचार्यांना काढून टाकण्याची शिफारस केली आहे. यासोबतच कंपनीचा भांडवली खर्च किमान 5 अब्ज डॉलर ते 25 अब्ज डॉलर प्रतिवर्ष कमी करण्यासाठी पत्र लिहिले आहे.
अल्टिमीटरच्या म्हणण्यानुसार मेटाने आपला खर्च वाढवला आहे. मेटाने अब्जावधी डॉलर्स खर्च केले आहेत. तसेच मेटाव्हर्स तयार करण्यासाठी जगभरातील हजारो कर्मचारी नियुक्त केले आहेत. मेटाने केलेली एवढी मोठी गुंतवणूक धोकादायक असल्याचे अल्टिमीटरने म्हटले आहे. त्यामुळे आता खर्च नियंत्रणासाठी फेसबुक कर्मचाऱ्यांची कपात करणार हे निश्चित मानले जात आहे.




























































