
बाद फेरीतला पहिलाच सामना एकतर्फी झाला. साखळीत अपराजित असलेल्या नेदरलॅण्ड्सने अमेरिकेचा 3-1 असा सहज पराभव करीत फिफा वर्ल्ड कपच्या उपांत्यपूर्व फेरीत सर्वप्रथम धडक मारली. नेदरलॅण्ड्सकडून मेम्फिस डिपे, डेली ब्लिंड आणि डेंझल डुम्फ्रिज यांनी गोल करून आपला उपांत्यपूर्व फेरीतला प्रवेश निश्चित केला.
आजच्या सामन्यात अमेरिकेकडे 59 टक्के चेंडू असूनही त्यांना पहिला गोल करण्यासाठी 76 मिनिटे संघर्ष करावा लागला. अमेरिकेच्या पुलिसिच, फरेरा, व्हिया, मॅकेनी यांनी गोल करण्यासाठी जोरदार प्रयत्न केले, पण आज त्यांच्या पासेस ना आणि किकना फिनिश टचची साथच लाभली नाही. त्यामुळे ते नेदरलॅण्ड्सच्या खेळापुढे खूपच खुजे वाटले. याउलट नेदरलॅण्ड्सने गोल करण्यासाठी जीवाचे रान केले. डिपेने दहाव्या मिनिटालाच नेदरलॅण्ड्सला आघाडी मिळवून देणारा गोल केला तर ब्लिंडने मध्यंतराच्या अतिरिक्त वेळेत गोल करून संघाची आघाडी 2-0 ने वाढवली. त्यानंतरचा गोल अमेरिकेच्या हाजी राईटने 76 व्या मिनिटाला करून नेदरलॅण्ड्सला प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न केला, पण 81 व्या मिनिटाला डुम्फ्रिजने तिसरा गोल केला आणि आपल्या उपांत्यपूर्व प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.
स्विसची आगेकूच
स्वित्झर्लंडला बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी खूपच घाम गाळावा लागला. सर्बियाने स्वित्झर्लंडला काँटे की टक्कर देत मध्यंतराच्या आधी 2-1 अशी आघाडीही घेतली होती. पण स्वित्झर्लंडने मध्यंतराच्या पूर्वी आणि मध्यंतरानंतर ताबडतोब गोल ठोकत 3-2 अशी आघाडी घेतली आणि ती शेवटपर्यंत कायम राखण्यात यश मिळविले. या यशामुळेच संघर्षानंतर स्वित्झर्लंडने विजयही मिळविला आणि बाद फेरीही गाठली. आता बाद फेरीत स्विसचा सामना पोर्तुगालशी होईल. स्विसकडून झेरदान शकिरी (20), ब्रिल एम्बोलो (44) आणि रेमो फ्रॉयलर (48)ने गोल केले तर सर्बियाकडून अलेक्सांदर मित्रोविच (26), दुसान व्लाहोविच (35)ने गोल केले.




























































