पाचशे रुपयांसाठी केली जिवलग मित्राची हत्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
fight
file photo

सामना ऑनलाईन। गुरुग्राम

नवी दिल्लीजवळील गुरुग्राम येथे अवघ्या पाचशे रुपयांसाठी चार जणांनी मित्राची गळा दाबून हत्या केल्याची भयंकर घटना घडली आहे. पोलिसांना 17 मार्च रोजी गुरुग्राम सेक्टरजवळील नवादा भागात नाल्यात एका तरुणाचा मृतदेह सापडला. त्यानंतर काही तासातच पोलिसांनी या हत्येचा उलगडा केला. अमृत असे या मृत तरुणाचे नाव आहे. पोलीस पुढील तपास करत आहे्त.

अमृत रिक्षा चालवायचा. काही दिवसांपूर्वी त्याने जिवलग मित्राकडून 500 रुपये उधार घेतले होते. पण ठरलेल्या मुदतीत ते त्याने परत केले नव्हते. यावरून मित्राबरोबर त्याचा वादही झाला होता. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणेच बंद केले. रविवारी संबंधित मित्र इतर तीन जणांना घेऊन अमृतच्या घरी आला. त्यानंतर अमृत रिक्षा चालवायला जातो असे सांगून त्या चौघांबरोबर घराबाहेर पडला. पण रात्री उशीरापर्यंत तो परतलाच नाही. यामुळे दुसऱ्या दिवशी सकाळी अमृतच्या घरातल्यांनी पोलिसात धाव घेतली. त्यानंतर अमृतचा शोध घेत असता एका नाल्यात तरुणाचा मृतदेह तरंगत असल्याचे नागरिकांनी पोलिसांना सांगितले. मृतदेहाजवळ सापडलेल्या वस्तूंवरून तो अमृत असल्याचेच स्पष्ट झाले.

नंतर पोलिसांनी अमृतच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून त्याचा मित्र व इतर तीनजणांना अटक केली. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या चौकशीत चारही आरोपींनी अमृतची गळा दाबून हत्या केल्याचे व मृतदेह पाण्यात बुडावा म्हणून त्याच्या कपड्यांमध्ये दगडं भरल्याची कबुली दिली. त्यानंतर या चौघाही आरोपींना अटक करण्यात आली आहे. अवघ्या पाचशे रुपयांसाठी अमृतची हत्या केल्याचे समोर आल्यानंतर संपूर्णच गावच संतापला असून आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.