भाजपने घराणेशाहीचा ढोल बडवणे बंद करावे – नवाब मलिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत आम्ही घराणेशाहीच्या विरोधात असल्याचे म्हटले होते परंतु दुसरीकडे उत्तरप्रदेशमध्ये ५६ उमेदवारांना ज्यांचे सगेसोयरे राजकारणात आहेत त्यांना तिकिट दिले. तुम्हाला घराणेशाहीचे वावडे आहे तर मग गोव्यामध्ये पती-पत्नीच्या जोड्या निवडणूक कशा काय लढवू शकतात? मग घराणेशाहीचा ढोल बडवणे बंद करावे असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी भाजपला दिला आहे.

भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गोवा निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. ते परिवारवादाचीच उपज नाहीत काय? असा सवाल देखील नवाब मलिक यांनी उपस्थित केला. केंद्रातील मंत्र्यांची यादी तपासून पाहा, अनेक मंत्र्यांची घराणेशाही दिसेल. उत्तरप्रदेशमध्ये मंत्र्यांच्या नातलगांना तिकीट देण्यात आले आहेत. मग गोव्यातच तुम्ही परिवारवादाचा मुद्दा कशाला काढता? असा सवालही नवाब मलिक यांनी भाजपला केला आहे.

गोवा विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पणजीमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि गोवा विधानसभा निवडणुकीचे स्टार प्रचारक नवाब मलिक, प्रदेश प्रवक्ते व स्टार प्रचारक क्लाईड क्रास्टो यांनी आज पत्रकार परिषद घेतली.यावेळी गोव्याचे प्रदेश सरचिटणीस अनिल झोलापुरे आणि गोवा प्रदेश प्रवक्ते अविनाश भोसले उपस्थित होते.

गोव्यातील प्रचार अंतिम टप्प्यात आला असून खासदार प्रफुल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आम्ही गोव्याची निवडणूक लढवत आहोत. त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचा जाहीरनामा लवकरच जाहीर केला जाईल. गोव्याच्या जनतेने २०१७ च्या निवडणुकीत भाजपला नाकारले होते. काँग्रेसच्या पारड्यात बहुमत होते. त्यानंतर सत्ता मिळाल्यानंतरही भाजपने गोव्यातील जनतेला न्याय दिला नाही अशी जोरदार टिका नवाब मलिक यांनी केली.

महाराष्ट्रात काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मिळून 15 वर्ष आघाडीचे सरकार चालवले आहे. मात्र मागील काही वर्षांत काँग्रेसने विरोधी पक्ष म्हणून जी निर्णयक्षमता दाखवायला हवी, ती दाखवलेली नाही. त्यामुळे मागच्या दहा वर्षांपासून भाजप गोव्यात सत्तेत आहे. आज गोव्यात भाजपच्या 40 उमेदवारांची यादी पाहिली तर त्यामध्ये सर्व आयात केलेले उमेदवार आहेत. मुख्यमंत्री पदाचा दावेदार सोडला तर सर्व उमेदवार इतर पक्षातील आहेत, असेही नवाब मलिक म्हणाले.

स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर हे पणजी येथून तिकीट मागत होते, मात्र त्यांचे तिकीट कापून बाबूश मोंटेरा यांना तिकीट दिले गेले. बाबूश यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत, असे आरोप भाजपनेच याआधी केले होते. कालपर्यंत जो गुन्हेगार होता, तो आज कोणत्या गंगेत न्हायल्यामुळे पवित्र झाला? याचे उत्तर भाजपला द्यावे लागेल, असेही नवाब मलिक म्हणाले.

सत्ता राबवत असताना भाजपने चुकीची धोरणे राबविल्यामुळे गोव्यातील पर्यटन कमी झाले आहे. त्यामुळे बेरोजगारीत वाढ झाल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी यावेळी केला. राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या माध्यमातून सत्तेत आल्यास नवे पर्यटन धोरण राबविण्यात येईल, जेणेकरुन रोजगार वाढतील, असे आश्वासनही नवाब मलिक यांनी यावेळी दिले.

नैसर्गिक साधनसंपत्तीवर गोव्याचा पहिला हक्क आहे. नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर होत असताना निसर्गाला धक्का पोहोचणार नाही, याकडेही आम्ही लक्ष देऊ असेही नवाब मलिक म्हणाले.