गुजरातच्या सरकारी रुग्णालयात कोरोनापासून बचावासाठी यज्ञाचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाने पुन्हा थैमान घालायला सुरुवात केली आहे. बुधवारी सकाळी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार देशामध्ये 24 तासात 1,84,372 नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. गुजरातमध्येही कोरोनाचे वाढते आकडे धडकी भरवायला लागले आहेत. तिथल्या रुग्णालयांमध्ये सोईसुविधा अपुऱ्या पडायला लागल्या आहेत. या परिस्थितीत कोरोनापासून लोकांचा बचाव व्हावा यासाठी गुजरातच्या एका सरकारी रुग्णालयामध्ये यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. आर्य समाजाद्वारे या यज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. असा यज्ञ करावा हे आपल्याला रुग्णालय प्रशासनानेच सांगितल्याचं आर्य समाजाच्या सदस्यांनी सांगितले आहे.

सुरतमध्ये स्मशानदाह; अविरत मृतदेह जळतायत, विद्युतदाहिनीच्या चिमण्याही वितळल्या

स्मशानभूमीतही केला यज्ञ

रुग्णालयातील यज्ञापूर्वी आर्य समाजाच्या सदस्यांनी स्मशानभूमीत जाऊनही यज्ञ केला होता. रामनाथ घेला आणि कुरुक्षेत्र स्मशानभूमीत हा यज्ञ केल्याचे आर्य समाजचे अध्यक्ष उमाशंकर आर्य यांनी टाईम्स ऑफ इंडियाला दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे. अधिष्ठात्यांनी रुग्णालयामध्ये आपल्याला यज्ञ करायचे असल्याचे सांगितल्याने तिथेही जाऊन आपण यज्ञ केल्याचे आर्य यांनी म्हटले आहे.

अहमदाबादेत कोरोनाग्रस्तांच्या संख्येत झपाट्याने वाढ

गुजरातमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढत असून दर 3 तासाने एका कोरोनाग्रस्ताचा मृत्यू होत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. बेड मिळत नसल्याने काही रुग्णांचा अँम्ब्युलन्समध्येच मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे दगावलेल्यांवर अंत्यसंस्कार करण्यामध्येही बऱ्याच अडचणी येत आहे. स्मशानभूमीमध्ये येणाऱ्या मृतदेहांची संख्या वाढल्याने अंत्यसंस्कारासाठी जागा मिळवण्यासाठी बरीच वाट पाहावी लागत आहे.

गुजरातच्या राजधानीत कोरोनाग्रस्तांची संख्या जास्त

गुजरातमध्ये गेल्या 24 तासांत 6690 कोरोनाबाधित आढळले आहेत. अहमदाबादमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक असून तिथे 2251 नवे कोरोनाग्रस्त सापडले आहेत. गेल्या 24 तासात तिथे 23 जणांचा मृत्यू झाला आहे. अहमदाबादप्रमाणेच राजकोट आणि पोरबंदर इथेही परिस्थिती चिंताजनक बनत चालली आहे. अहमदाबादेत 1200 खाटांचे कोविड रुग्णालय उभे करण्यात आले आहे. इथल्या सगळ्या खाटा भरल्याने केंद्राबाहेर नवे रुग्ण घेऊन येणाऱ्या अँम्ब्युलन्सच्या रांगा लागल्या आहेत.