साय-फाय – चीनमधील भूस्खलन ; निसर्गाचा इशारा

>> प्रसाद ताम्हनकर

चीनमधील काही शहरांमध्ये भूस्खलनाच्या घटना मोठय़ा प्रमाणावर वाढू लागल्या आहेत. चीनमधील निम्म्याहून अधिक शहरांना याचा धोका असल्याचे संशोधकांचे मत आहे. जमिनीखाली असलेल्या पाण्याचा मोठय़ा प्रमाणावर केलेला उपसा यासाठीचे प्रमुख कारण असल्याचे संशोधनात समोर येत आहे. वाढते शहरीकरण आणि सध्या असलेल्या शहरांवरील वाढत चाललेला भारदेखील या आपत्तीसाठी जबाबदार असल्याचे काही संशोधक मानतात. याबरोबरच शहरासाठी वाहतूक व्यवस्था निर्माण करणे तसेच खनिजे आणि कोळशाचे उत्खननदेखील या समस्येला जबाबदार धरण्यात आले आहेत. चीनच्या उत्तरेकडे असलेल्या पिंगडिंगशान या सर्वात मोठय़ा कोळसा क्षेत्राची जमीन दरवर्षी 109 मिमी इतक्या तीव्र वेगाने धसली जात आहे.

ही समस्या चीनसाठी तशी नवी नाही. मात्र सध्या तिचा वाढता वेग चिंतेत भर घालणारा आहे. शांघाय आणि तियांजिन हे चीनचे प्रमुख प्रदेश भूस्खलनाला सामोरे जात असल्याचे 1920 साली समोर आले. गेल्या शतकात शांघायची जमीन तर तीन मीटरपेक्षा जास्त खाली खचली आहे. या समस्येचे गांभीर्य समोर आल्यावर इथल्या संशोधकांनी 20 लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या एकूण 82 शहरांमध्ये तपासणी सुरू केली. या उपक्रमात सेंटिनल-1 या उपग्रहाने गोळा केलेल्या माहितीचादेखील वापर करण्यात आला. सेंटिनल-1 च्या मदतीने या शहरांची समुद्रसपाटीपासूनची उंची मोजण्यास मदत झाली. 2015 ते 2022 च्या आकडेवारीने हे समोर आले की, 45 टक्के शहरी भागांची समुद्रसपाटीपासूनची उंची दरवर्षी 3 मिमीने कमी होते आहे, तर 16 टक्के शहरांमध्ये हे प्रमाण प्रतिवर्षी 10 मिमीवर पोहोचले आहे.

ही आकडेवारी संशोधकांची काळजी वाढवणारी मानली जात आहे. कारण जिथे ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, जमीन वेगाने धसत आहे अशा निवासी क्षेत्रात 6.7 करोड लोक राहत आहेत. जमिनीचे भूस्खलन हे भूगर्भातील घडामोडी, जमिनीवर पडणारे मोठमोठय़ा इमारतींचे वजन यावरदेखील अवलंबून असले तरी सध्याच्या परिस्थितीत मोठय़ा प्रमाणावर होत असलेला भूजलाचा उपसा हेच मुख्य कारण असल्याचे अनेक संशोधकांचे ठाम मत आहे.

2020 मध्ये चीनचे 6 टक्के क्षेत्र हे समुद्रसपाटीपासून कमी उंचीवर होते. आता येणाऱया 100 वर्षांत हे क्षेत्र 26 टक्क्यांवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. भूस्खलनाच्या समस्येच्या जोडीला समुद्राची वाढत चाललेली पातळी आणि हवामानातील बदल यामुळे मोठय़ा लोकसंख्येला पुराचा धोकादेखील निर्माण होतो आहे. स्थानिक लोकसंख्येच्या पाणी वापरासाठी शहराखाली असलेले आणि आजूबाजूच्या परिसरातील भूजलदेखील मोठय़ा प्रमाणावर उपसले जात आहे.

मेक्सिको सिटी, ह्युस्टन आणि दिल्लीसारख्या प्रमुख शहरांनी ही समस्या यापूर्वी अनुभवलेली आहे. भूजलाची पातळी ही मुख्यत्वे पर्जन्यमानावर अवलंबून असते. अनियमित पर्जन्यमानामुळे भूजल पातळीत होणारी घट चिंता वाढवणारी आहे. नुकत्याच गुजरात सरकारने विधानसभेत दिलेल्या माहितीनुसार गुजरातमधील एक तृतीयांश तालुक्यांमध्ये गेल्या दशकभरात सरासरीने 5.58 मीटर इतकी भूजल पातळी घटली आहे, तर महाराष्ट्रात नाशिकसारख्या शहराने गेल्या पाच वर्षांतील सर्वात नीचांकी पातळी गाठल्याचे वृत्त आहे. भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेने केलेल्या पाहणीच्या अहवालानुसार पुणे जिह्यातील 13 पैकी 12 तालुक्यांमधील पाणी पातळीमध्ये 0.52 ते 4.98 फूट इतकी घट झाल्याचे निदर्शनास आले.

मुंबईसारख्या आर्थिक राजधानीतील अनेक महत्त्वाच्या भागांना मार्च महिन्यापासून पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागतो आहे. बंगळुरूची भीषण पाणीबाणी डोळ्यांसमोर असताना आणि तिथल्या नागरिकांचे होत असलेले हाल रोज लाइव्ह दिसत असताना या सर्वातून काही बोध घेऊन आपण पाणी वापराचे काही नियम स्वतला घालून घेणार आहोत का? हा खरा महत्त्वाचा प्रश्न.
>> [email protected]