
हार्दीक पांड्याची 51 धावांची जबरदस्त फलंदाजी व चार बळींच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा दारुण पराभव केला आहे. टीम इंडियाने दिलेले 199 धावांचे लक्ष्य गाठत असताना इंग्लंडचा संघ 150 धावांवर तंबूत परतला होता. या मालिकेत टीम इंडियाने 1-0 ने आघाडी घेतली आहे.
टॉस जिंकून टीम इंडियाने पहिला फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहीत शर्माने चांगली सुरुवात करून देत 14 चेंडूत 24 धावा केल्या. ज्यात चार चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर मोईन अलीने रोहीत शर्मा व इशान किशन यांना माघारी पाठवले. 46 धावांवर दोन विकेट पडल्यावर टीम इंडियाची वाट खडतर दिसत असतानाच सुर्यकुमार व दीपक हुड्डा यांनी चांगला खेळ दाखवला. सुर्यकुमारने 19 चेंडूत 39 धावा तर दीपकने 17 चेंडूत 33 धावा केल्या. मात्र क्रिस जॉर्डनने या दोघांच्या विकेट घेतल्या व टीम इंडिया धक्का दिला. त्यानंतर आलेल्या हार्दीक पांड्याने 33 चेंडूत 51 धावा केल्या. यात सहा चौकार व एक षटकाराचा समावेश होता. हार्दीक पांड्याचे हे टी-20 मधले पहिले अर्धशतक आहे. मात्र हार्दीकपांड्या बाद झाल्यानंतर इतर खेळाडू एकापाठोपाठ एक बाद झाले व टीम इंडियाचा डाव 199 वर आटोपला.
199 चे लक्ष्य गाठण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला पहिल्या ओव्हरमध्येच भुवनेश्वरने धक्का देत जोस बटलरला बाद केले. त्यानंतर हार्दीक पांड्याने चार विकेट घेत इंग्लंडला धक्का दिला. हार्दीक पांड्याने 4, भुवनेश्वरने एक, अर्शदीप सिंग याने 2, चहलने 2 आणि हर्षल पटेलने 1 विकेट घेत टीम इंडियाला विजय मिळवून दिला.




























































