सावधान! ‘या’ 3 देशांचा प्रवास करू नका, इबोलाच्या उद्रेकानंतर केंद्र सरकारची अ‍ॅडव्हायझरी जारी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आफ्रिकेतील तीन देशांमध्ये इबोला विषाणूचा प्रादुर्भाव अत्यंत वेगाने आणि गंभीररित्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आपल्या नागरिकांना काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान या देशांमध्ये गरज नसल्यास प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. तसेच जे हिंदुस्थानी नागरिक सध्या या तिन्ही देशांमध्ये वास्तव्यास आहेत त्यांना आवश्यक ती सर्व खबरदारी घेण्याचे आणि स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘इंडिया टूडे‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

काँगो आणि इतर प्रभावित देशांमधील बदलती परिस्थिती लक्षात घेता तसेच जागतिक आरोग्य संघटनेच्या शिफारशींनुसार केंद्र सरकार आपल्या सर्व नागरिकांना लोकशाही प्रजासत्ताक काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा गरज नसेल तर प्रवास टाळण्याचा सल्ला देत आहे, असे केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

जागतिक आणीबाणी घोषित

जागतिक आरोग्य संघटना आणि आफ्रिका सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन यांनी या आफ्रिकन देशांमधील इबोलाच्या उद्रेकाला जागतिक आणीबाणी घोषित केल्यानंतर हिंदुस्थानने हे पाऊल उचलले आहे. आंतरराष्ट्रीय आरोग्य नियमांनुसार (IHR, 2005), 17 मे 2026 रोजी काँगो आणि युगांडामधील इबोलाच्या परिस्थितीला आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी म्हणून घोषित करण्यात आले आहे.

इबोला संकट! संघ शिखर परिषद पुढे ढकलली

22 मे 2026 रोजी जारी केलेल्या नवीन निर्देशानुसार, बाधित देशांमधील आरोग्य यंत्रणांना आंतरराष्ट्रीय सीमांवर आणि विमानतळांवर देखरेख वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विषाणूबाधित भागातून येणाऱ्या आणि ताप असलेल्या प्रवाशांची तपासणी करणे, त्यांची नोंद करणे आणि त्यांना विलगीकरणात ठेवणे या उपाययोजनांवर भर दिला जात आहे.

धोका आणि लक्षणे

हा इबोला उद्रेक प्रामुख्याने बुन्दिबुग्यो विषाणू या स्ट्रेनमुळे होत आहे. हा एक अत्यंत घातक व्हायरल हेमोरेजिक फिव्हर आहे. या आजारामध्ये मृत्यूचा दर अत्यंत जास्त असतो आणि मानवी शरीरावर याचा गंभीर परिणाम होतो. चिंतेची बाब म्हणजे सध्या बुन्दिबुग्यो स्ट्रेनला रोखण्यासाठी किंवा त्यावर उपचार करण्यासाठी कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा विशिष्ट थेरपी उपलब्ध नाही. त्यामुळे सुरुवातीच्या काळातच लक्षणे शोधणे आणि रुग्णाला इतरांपासून वेगळे करणे हाच एकमेव उपाय आहे.