पक्षाच्या आमदारांची आसनव्यवस्था विरोधी पक्षांच्या बाकांवरच करावी; राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा अध्यक्षांकडे मागणी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची आसनव्यवस्था विरोधी पक्षांच्या बाकांवरच करण्यात यावी, असे मागणी करणार पत्र राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पाठवले आहे. याबाबतची माहिती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिली. तसेच, 9 आमदारांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे, असेही आव्हाड यांनी सांगितलं.

अजित पवार यांच्या गटाने रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या आमदारांच्या भेटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका बदलणार का, याबाबत चर्चा होत आहेत. या भेटीनंतर शरद पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुरोगामी भूमिका घेऊन आपल्याला पुढे जायचे आहे. मला भाजपसोबत जायचे नसून आपल्याला संघर्ष करायचा आहे, असे शरद पवार यांनी सांगितले आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विरोधी पक्षांच्या बैठकीला जाणार का, याबाबत जितेंद्र आव्हाड म्हणाले की, शरद पवार बंगळुरूतील बैठकीला उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते विरोधी पक्षांच्या नेत्यांशी चर्चा करतील. त्यानंतर ते दिल्लीला जाणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या भूमिकेत बदल नाही, असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. राष्ट्रवादीच्या आमदारांना व्हीप जारी करण्यात आला आहे का, अशी विचारणा केल्यावर आव्हाड म्हणाले की, मी व्हीप जारी केला नाही. विधानसभा अधिवेशनाला उपस्थित राहा, तेवढा पक्षादेश काढण्यात आला आहे.