खेड – खासगी डॉक्टरकडून लाच घेताना माजी सरपंचासह प्रशासक लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर न पाळणाऱ्या वैद्यकीय व्यवसायिकाच्या दवाखान्यास बजावलेली कारवाईची नोटीस रद्द करण्यासाठी लाच स्विकारणाऱ्या पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व भरणे ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून नेमणुकीस असेलेले देवानंद रामलाल मासरकर (५२) आणि भरणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील चिले या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. कालरात्री ८ वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशननजीकच्या एका हॉटेल परिसरात ही कारवाई झाली. प्रशासकावर झालेल्या या कारवाईमुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायंतीवर शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांना भ्रष्टाचारासाठी नवं कुरण तर निर्माण करून दिल गेलं नाही ना अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

वैद्यकीय व्यवसायिकाच्या दवाखान्यास बजावलेली कारवाईची नोटीस रद्द करण्यासाठी लाच स्विकारणाऱ्या ग्रामपंचायतीचे प्रशासक आणि भरणे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ ताब्यात घेतले. देवानंद रामलाल मासरकर आणि सुनील चिले अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशननजीकच्या एका हॉटेल परिसरात ही कारवाई झाली. प्रशासकावर झालेल्या या कारवाईमुळे मुदत संपलेल्या ग्रामपंचायंतीवर शासकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करून त्यांना भ्रष्टाचारासाठी नवं कुरण तर निर्माण करून दिल गेलं नाही ना, अशी शंका उपस्थित होऊ लागली आहे.

या प्रकरणातील तक्रारदार यांचा भरणे येथे खासगी दवाखाना आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु असल्याने वैद्यकीय व्यवसायाच्या ठिकाणी गर्दी करून सामाजिक अंतर पाळले जात नसल्याची तोंडी तक्रार ग्रामस्थांनी केली होती. त्यानुसार भरणे ग्रामपंचायतीने 23 सप्टेंबर रोजी दवाखान्यास नोटीस बजावून याबाबतचा खुलासा करण्याची सूचना केली होती. समाधानकारक खुलासा न केल्यास कारवाई करण्याची तंबीही प्रशासक मासरकर याने तक्रारदारास दिली होती.

वैद्यकीय व्यायसायिकांकडून समाधानकारक खुलासा न मिळाल्याने प्रशासकाने दिलेल्या तंबी नुसार त्या व्यायसायिकाला कारवाईची नोटीस बजावण्यात आली. त्यानंतर नोटिसी नुसार कारवाई केली जाऊ नये, यासाठी प्रशासक मासारकर याने तक्रारदाराकडे 20 हजार रूपयांची लाच मागतली होती. तक्रारदाराने त्यातील 10 हजार रूपये प्रशासक मासारकर यांना दिलेही होते. मात्र उर्वरित रकमेसाठी मासारकर यांनी तक्रारदाराकडे तगादा लावला होता. इतकेच नव्हे तर उर्वरित रक्कम न मिळाल्यास पुढील कारवाई अटळ असल्याचे तक्रारदारास धमकावण्यात आले होते.

प्रशासक मासारकर याच्या या धमकावण्यामुळे त्या खासगी डॉक्टरने लाचलुचपत खात्याकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीबाबत शहानिशा केल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवारी 28 सप्टेंबर रोजी सापळा रचला होता. दरम्यान 10 हजाराच्या रकमेत तडजोड करून ही रक्कम 7 हजारावर आणण्यात आली होती. या सात हजारांपैकी स्वतःसाठी पाच तर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सुनील चिले यांच्यासाठी दोन हजार ठरविण्यात आले होते.

सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खेड रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या एका हॉटेल परिसरात मासारकर आणि सुनील चिले हे दोघे लाचेची रक्कम स्वीकारण्यासाठी आले होते. त्या खासगी डॉक्टरकडून ही रक्क्म स्वीकारत असतानाच तिथेच सापळा टाकून बसलेल्या लाचलुचपत खात्याच्या अधिकाऱ्यांनी मासरकार आणि सुनील चिले या दोघांना रंगे हात ताब्यात घेतले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक नितीन विजयकर, पोलीस निरीक्षक प्रवीण कदम, पोलीस नाईक विशाल नलावडे, योगेश हुंबरे, पोलीस शिपाई हेमंत पवार यांनी ही कारवाई पार पडली.