सन्नाटा! ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचे मंगळवारी कोरोनाने निधन झाले. ते 81 वर्षांचे होते. गेल्या आठवडय़ात त्यांना ठाणे येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.

किशोर नांदलस्कर यांनी मराठी रंगभूमी तसेच हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली होती. वाटय़ाला आलेली भूमिका छोटी असली तरी त्यांच्या वैशिष्टय़पूर्ण अभिनयाने, विनोदी शैलीने ती प्रेक्षकांच्या स्मरणात राहिली. नांदलस्कर यांनी आतापर्यंत सुमारे 40 नाटके, 25 हून अधिक मराठी-हिंदी चित्रपट आणि 20 हून अधिक मालिकांमधून काम केले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि तीन मुलगे असा परिवार आहे.

खारेपाटणजवळील शेजवली हे नांदलस्कर यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म मुंबईत झाला. लॅमिंग्टन रोड, नागपाडा, घाटकोपर तेथे त्यांचे लहानपण गेले. ‘न्यू इरा हायस्कूल’ आणि ‘युनियन हायस्कूल’मध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. किशोर नांदलस्कर यांना अभिनयाचा वारसा त्यांचे वडील खंडेराव यांच्याकडून मिळाला होता. त्यांच्या वडिलांनी त्या काळात नाटकांमधून स्त्री भूमिका केल्या होत्या. 1980 च्या सुमारास दूरदर्शनवरील ‘गजरा’ व अन्य कार्यक्रमांतून किशोर नांदलस्कर यांना हळूहळू ओळख मिळाली. पुढे  ‘नाना करते प्यार’, ‘सारे सज्जन’, ‘शेजारी शेजारी’, ‘हळद रुसली कुंकू हसलं’ अशा अनेक चित्रपटांतील त्यांच्या भूमिका गाजल्या. ‘चल आटप लवकर’, ‘भ्रमाचा भोपळा’, ‘पाहुणा’, ‘श्रीमान श्रीमती’, ‘भोळे डॅम्बीस’, ‘वन रूम किचन’ आदी नाटकांमधून त्यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले.

महेश मांजरेकर यांच्या ‘वास्तव’ चित्रपटातून नांदलस्कर यांचा बॉलीवूडमध्ये प्रवेश झाला. ‘जिस देश में गंगा रहता है’, ‘तेरा मेरा साथ है’, ‘खाकी’, ‘ये तेरा घर ये मेरा घर’, ‘हलचल’, ‘सिंघम’, ‘प्राण जाए पर शान न जाए’ या हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिकादेखील गाजल्या.

आपली प्रतिक्रिया द्या