पार्थच्या वडिलांनी पॅचअप केले, मी मात्र त्याच्या पराभवाचा बदला घेणार; रोहित पवार यांनी अजित पवारांना डिवचले

बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशी लढत होत आहे. ही पवार विरोधातील पवार लढाई आता मावळ लोकसभा मतदारसंघातपर्यंत पोहचली आहे. मावळमध्ये सध्या अजित पवार विरुद्ध रोहित पवार असा आमना-सामना होताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यावर अनेकदा निशाणा साधला आहे. भाजपकडून एका मोठ्या नेत्याला संपवण्याचा डाव असल्याचे सांगत याआधी त्यांनी अजित पवार यांना इशाराही दिला होता. आता त्यांनी पार्थ पवार याच्या पराभवाचा बदला घेणार असे वक्तव्य करत पुन्हा एकदा अजित पवार यांना डिवचले आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार मावळ लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीला उभे होते. अजित पवारांचा मुलगा म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने मावळची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवार यांचा दारुण पराभव केला होता. रोहित पवार यांनी हाच मुद्दा उकरुन काढत अजित पवार आणि पार्थ पवार यांना डिवचले आहे. रोहित पवार यांनी मावळ लोकसभा मतदारसंघातील आपल्या भावाचा पराभवाचा बदला घेण्याचे वक्तव्य केले आहे.

माझा भाऊ पार्थ पवार याचा पराभव महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केला आहे. पार्थचे वडील अजित पवार स्वतः श्रीरंग बारणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते. त्यांनी आधी वडीलधाऱ्या शरद पवारांची साथ सोडली, आता पार्थचा पराभव करणाऱ्यांचा प्रचार वडील अजित पवार करत आहेत. पार्थचा पराभव पचवून नव्हे तर अजित पवार यांना स्वतःचे बरेच काही पचवायचे असल्याने ते श्रीरंग बारणे यांचा प्रचार करत आहेत, असा टोलाही रोहित पवार यांनी लगावला. पार्थने चिंता करू नये. मी त्याचा भाऊ म्हणून त्याच्या पराभवाचा बदला घ्यायला मावळ लोकसभेत आलो आहे, असे रोहित पवार म्हणाले. या गोष्टीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरु आहे.