मँचेस्टरही आमचेच! बेअरस्टॉच्या झंझावातामुळे 275 धावांची आघाडी, इंग्लंड ऍशेस मालिकेत बरोबरीच्या उंबरठय़ावर 

इंग्लंडच्या बॅझबॉलवृत्तीने कसोटी क्रिकेटचाच नव्हे तर ऍशेसचाही रंग बदलला आहे. दुसऱया दिवशी 4 बाद 384 धावा करून कसोटीवर आपले वर्चस्व प्रस्थापित करणाऱया इंग्लंडने तिसऱया दिवशी जॉनी बेअरस्टॉच्या झंझावाती नाबाद 99 धावांमुळे 35.4 षटकांत 208 धावा चोपून काढत 275 धावांची प्रचंड आघाडी घेतली. इंग्लंडचा पहिला 592 धावांवर संपल्यानंतर पिछाडीवर असलेल्या ऑस्ट्रेलियाची 2बाद 60 अशी स्थिती करून लीड्सनंतर मँचेस्टरही आमचेच असल्याचे त्यांनी दाखवून दिले आहे. 

गुरुवारी झॅक क्राऊलीचे वादळ घोंघावले होते तर आज सातव्या क्रमांकावर आलेल्या जॉनी बेअरस्टॉने कहर केला. 50 चेंडूंत 49 धावा करणाऱया बेअरस्टॉने पुढील 31 चेंडूंत 5 चौकार आणि 4 षटकार खेचत 50 धावा ठोकल्या. एवढेच नव्हे तर शेवटच्या विकेटसाठी 47 चेंडूंत 66 धावांची तुफानी भागी करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना अक्षरशः वेड लावले. तो शतकाच्या उंबरठय़ावर असताना कॅमरून ग्रीनने जेम्स ऍण्डरसनला पायचीत करून इंग्लंडचा डाव संपवला आणि बेअरस्टॉचे शतकही एका धावेने हुकवले. 

इंग्लंडने 107.4  षटकांत साडेपाच धावांच्या सरासरीने 592 धावा काढत आपला आक्रमकपणा तिसऱया दिवशीही कायम ठेवला आणि 275 धावांनी प्रचंड आघाडी घेतली. त्यामुळे बॅकफूटला पडलेल्या ऑस्ट्रेलियाने 60 धावेतच आपले दोन्ही सलामीवीर गमावत कसोटीवरील आपली पकड आणखी ढिली केली. गेले तिन्ही सामने पाचव्या दिवशी संपले असले तरी चौथ्या कसोटीचा निकाल चौथ्या दिवशीच लावत इंग्लंड ऍशेस मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधणार याचे स्पष्ट संकेत आजच मिळाले आहेत.