
कन्नड सक्तीसह सीमाप्रश्नासंदर्भात कितीही दडपशाही केली तरी लोकशाही मार्गाने 29 जून रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वर्षा बंगल्यावर आंदोलनाने धडक देण्याचा निर्धार महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या दौऱयात कोल्हापूर पोलिसांनी केलेल्या दडपशाहीच्या विरोधात प्रचंड संताप व्यक्त करण्यात येत आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या कोल्हापूर येथील सभेत पोलीस प्रशासनाकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर दडपशाही करत त्यांना सभेतून ओढून बाहेर काढण्यात आले. सीमाभागातील मराठी बांधवांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. मराठी भाषिकांना पोलिसांनी धक्काबुक्की करत ताब्यात घेतले. यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेल्या महाराष्ट्राच्या एकाही लोकप्रतिनिधीने हस्तक्षेप केला नाही, याबद्दल सीमाभागात तीव्र संताप व्यक्त होत आहे. सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी आम्ही आता मागे हटणार नसून, तीव्र आंदोलन करण्याचा ठाम निर्धार करण्यात आला आहे, असे मरगाळे यांनी सांगितले.
कन्नड सक्तीला विरोध करणाऱया समिती कार्यकर्त्यांना महाराष्ट्राच्या लोकप्रतिनिधींकडून सहकार्य मिळत नसल्याने नाराजी उमटली आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नात कर्नाटक सरकारकडून सीमाभागात होत असलेल्या कन्नड सक्तीविरोधात केंद्रीय मंत्री अमित शहा यांना निवेदन देण्याची परवानगी मागितलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांना बेळगावतच स्थानबद्ध करण्यात आले. कोल्हापूर पोलिसांनी दिलेल्या पत्रामुळे कार्यकर्त्यांना रोखण्यात आले, याबाबत युवा नेते अंकुश केसरकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. केवळ बेळगाव पोलीसच नव्हे, तर कोल्हापूर पोलीस प्रशासनानेही दडपशाही केली. या प्रकाराने सीमालढय़ासाठी झटणारे कार्यकर्ते संतप्त झाले असून, या प्रश्नात कोल्हापूर प्रशासनानेच सीमावासीयांची थट्टा केल्याची प्रतिक्रिया उमटत आहे. हत्तरर्गी येथील टोलनाक्यावर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या पदाधिकाऱयांना महाराष्ट्र सरकारच्या सूचनेवरून कर्नाटक पोलिसांनी रोखले, असा आरोपही समितीने केला आहे.
कोल्हापूर पोलिसांच्या पत्रामुळेच सीमाबांधवांना हत्तरगीत रोखले
महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष प्रकाश मरगाळे व कोल्हापुरातील मराठा महासंघाचे अध्यक्ष वसंत मुळीक यांनी 15 जूनला कोल्हापूर जिल्हाधिकाऱयांना याबाबत पत्र दिले होते. या पत्रावरून परवानगी मिळेल असे वाटत असतानाच, पोलीस प्रशासनाने याच पत्राचा आधार घेऊन एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची वाहने बेळगाव पोलिसांनी हत्तरगी येथेच रोखून धरली होती. कार्यकर्त्यांनी त्याच ठिकाणी ‘रास्ता रोको’ आंदोलन करीत याबाबत एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी बेळगाव पोलिसांना विचारले असता, त्यांनी कोल्हापूर पोलीस अधीक्षकांनीच पत्र पाठवून तुम्हाला स्थानबद्ध करण्याची सूचना केल्याची माहिती दिली. तसे पत्रही संबंधित अधिकाऱयांनी समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांना दाखवले. एवढेच नव्हे, तर इंग्रजीत असलेल्या या पत्रात कोल्हापूर पोलिसांनी मरगाळे यांच्यासह समितीचे माजी आमदार मनोहर किल्लेकर, बेळगावचे माजी महापौर मालोजी अष्टेकर यांच्या नावाचाही उल्लेख केल्याचे दिसून आले.




























































