नेत्यांनी, स्टार प्रचारकांनी मास्क वापरावा! निवडणूक आयोगाचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना संक्रमणकाळात सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान स्टार प्रचारकांना आणि नेत्यांना मास्कचा वापर करण्याविषयी निवडणूक आयोगाने आदेश जारी केले आहेत. राजकीय पक्षांनी कोविड-19 नियमावलीचे गंभीरतेने पालन करावे, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. राजकीय पक्षांनी कोरोना नियम डावलले तर त्यांच्या सार्वजनिक बैठका, रॅलीवर बंदी आणण्यात येईल, असा इशाराही निवडणूक आयोगाने आदेशात दिला आहे.

निवडणूक आयोगाने सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या नेत्यांना एक पत्र पाठविले आहे. देशभरात कोरोना संक्रमणाचा फैलाव वेगाने होताना दिसून येतोय. अशावेळी निवडणूक बैठका, प्रचारादरम्यान आयोगाच्या निर्देशांना डावलून सोशल डिस्टन्सिंग, मास्कचा वापर करण्याच्या नियमांचे सर्रास उल्लंघन होताना निदर्शनास येत आहे, असे निवडणूक आयोगाने पत्रात म्हटले आहे.

दिल्ली उच्च न्यायालयाने निवडणूक प्रचारादरम्यान मास्कचा वापर करण्यासंदर्भात दाखल करण्यात आलेल्या एका याचिकेवर सुनावणी करताना निवडणूक आयोगाला आणि केंद्राला एक नोटीस पाठवली होती. या प्रकरणात न्यायालय पुढची सुनावणी 30 एप्रिल रोजी करणार आहे. कोरोना नियमांचे वारंवार उल्लंघन करणाऱ्या प्रचारक आणि उमेदवारांवर बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली आहे.