
सर्वसामान्यांना राज्यभरात भाड्याने घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडा दिवाळीत रेंटल हाऊसिंग पोर्टल सुरू करणार आहे. या पोर्टलची निर्मिती, व्यवस्थापन आणि अंमलबजावणीसाठी गृहनिर्माण विभागाकडून म्हाडाची नोडल एजन्सी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. येत्या आठवडाभरात याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोर्टलच्या कामाला गती मिळण्यासोबतच शासनाच्या विविध विभागाशी समन्वय साधणे म्हाडाला सोपे होणार आहे.
केंद्र सरकारच्या निर्देशानुसार, मुंबईसह एमएमआरमध्ये ग्रोथ हब उभारले जाणार आहे. त्यामुळे भविष्यात भाड्याच्या घरांना मोठी मागणी असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने म्हाडाच्या माध्यमातून रेंटल हाऊसिंग पॉलिसी तयार केली असून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. त्याचाच एक भाग म्हणून म्हाडा स्वतःचे पोर्टल लाँच करणार आहे. या पोर्टलच्या निर्मितीसाठी म्हाडाने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसला पंत्राट दिले आहे. म्हाडाच्या या पोर्टलमुळे घर भाड्याने घेण्यासाठी किंवा देण्यासाठी दलालांवर विसंबून राहण्याची गरज भासणार नाही. नाममात्र सर्व्हिस चार्ज भरून नागरिक या सुविधेचा लाभ घेऊ शकतील.
भाडे करारनामा, पोलीस व्हेरिफिकेशन एकाच ठिकाणी
भाडे करारनामा, पोलीस व्हेरिफिकेशन यासारख्या सुविधाही या पोर्टलवर उपलब्ध असणार आहेत. एकाच प्लॅटफॉर्मवर या सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी म्हाडाला नोंदणी व मुद्रांक विभाग, पोलीस, महापालिकेचे काही विभाग अशा विविध विभागांशी समन्वय साधावा लागणार आहे. म्हाडाच्या पोर्टलच्या माध्यमातून घर भाड्याने दिल्यास किंवा घेतल्यास त्याला कायदेशीरदृष्टय़ा संरक्षण असणार आहे. त्यासाठी ई-कोर्टदेखील असणार आहे. याशिवाय भाडोत्रीने पैसे बुडवल्यावर मालकाचे नुकसान होऊ नये यासाठी घरभाड्याला विम्याचे कवच देण्याचीदेखील योजना विचाराधीन आहे.




























































