पट्टेरी वाघाचे कातडे विक्रीसाठी आणणाऱ्या तिघांना पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजोळे येथील महादेव नगर परिसरात पट्टेरी वाघाचे कातडे विक्रीसाठी आणणार्‍या 3 संशयितांना शहर पोलिसांच्या पथकाने मुद्देमालासह अटक केली. ही कारवाई मंगळवार, 2 मे रोजी सायंकाळी 7 वा.करण्यात आली. बुधवारी संशयितांना न्यायालयाने शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

दीपक मोहन चव्हाण (32, रा. ओरी तिवराटवाडी, रत्नागिरी), गौतम सिताराम सावंत (40, रा.भोके बौद्धवाडी,रत्नागिरी) आणि प्रशांत प्रभाकर चवेकर (38,रा.केळ्ये मजगाव बौध्दवाडी,रत्नागिरी) अशी अटक करण्यात आलेल्या तीन संशयितांची नावे आहेत. मंगळवारी सायंकाळी पट्टेरी वाघाचे कातडे विक्रीसाठी 3 संशयित मिरजोळे परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती शहर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार,पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचला होता. सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तीन संशयित अ‍ॅक्टिव्हा दुचाकी (एमएच-08-एएच-4210) वरून संशयितरित्या तेथे फिरताना पथकाला दिसले.

पोलिसांनी त्यांची चौकशी करून झडती घेतली असता त्यांच्याकडे पट्टेरी वाघाचे कमावलेले सुकलेले शेपटीपासून डोक्यापर्यंत 46इंच लांब आणि 33 इंच रुंद कातडे सापडले. त्यांना अटक करण्यात आले असून त्यांच्याविरोधात वन्यजिव संरक्षण अधिनियम 1972चे कलम 39, 44, 48, 50, 51 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही संशयितांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने तिघांनाही शुक्रवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.