धर्म संसदेतील वक्तव्यांचा हिंदुत्वाशी संबंध नाही; मोहन भागवत यांची स्पष्ट भूमिका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धर्म संसदेत केलेल्या वक्तव्यांचा हिंदू धर्म किंवा हिंदुत्वाशी संबंध नाही. एखाद्यावेळी रागाच्या भरात काही बोललो असेल तर ते हिंदुत्व होत नाही, अशी स्पष्ट भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडली. हिंदुत्वावर विश्वास ठेवणारे लोक धर्म संसदेतील विधानांचं कधीच समर्थन करणार नाहीत असंही ते म्हणाले.

‘राष्ट्रीय एकात्मता आणि हिंदुत्व’ या विषयावर मुंबईत रविवारी आयोजित एका कार्यक्रमात मोहन भागवत यांनी रायपूर येथील धर्म संसदेचा संदर्भ देत धर्म संसदेतील वक्तव्यांना विरोध दर्शवला. आरएसएस किंवा हिंदुत्वाचे अनुयायी अशा वक्तव्यांवर विश्वास ठेवत नाहीत. लोकांमध्ये फूट पाडण्यात नाही, तर मतभेद दूर करून समाजाला एकत्र आणण्यावर संघाचा विश्वास आहे. आम्हाला हे काम हिंदुत्वाच्या माध्यमातून करायचं असल्याचे भागवत यांनी स्पष्टपणे सांगितले.

वीर सावरकरांनी हिंदू धर्मातील समुदायाच्या एकतेबद्दल, त्यांना संघटित करण्याबद्दलचा विचार मांडला होता. त्यांनी त्या गोष्टी भगवद्गीतेचा संदर्भ देत मांडल्या होत्या. कुणालाही संपवण्यासाठी किंवा नुकसान करण्यासाठी ते बोलले नव्हते, असे भागवत म्हणाले.

देशाची राज्यघटना हिंदुत्वाला पूरक

हा देश ‘हिंदुराष्ट्र’ होण्याच्या मार्गावर आहे का? या प्रश्नावर मोहन भागवत म्हणाले, कुणी मान्य करो की न करो, हा देश हिंदुराष्ट्र आहे. देशाची राज्यघटनादेखील हिंदुत्वाला पूरक आहे. हे तसेच आहे जशी देशाच्या अखंडतेची भावना आहे. राष्ट्रीय अखंडतेसाठी सामाजिक समता कधीही आवश्यक नसते. भिन्नतेचा अर्थ विलगीकरण होत नाही, असे मोहन भागवत म्हणाले.