
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीसाठी होणाऱ्या मतदानासाठी अवघे काही दिवस बाकी आहेत. सत्ताधारी भाजप आणि काँग्रेसमध्ये तुल्यबळ लढत होण्याची शक्यता आहे. राज्यातील राजकीय वातावरण गरम असून यात सट्टाबाजारही मागे नाही. प्रसारमाध्यमांमध्ये आलेल्या वृत्तानुसार मतदानाला अवघे सात ते आठ दिवस बाकी असताना सट्टाबाजारात सत्ताधारी भाजप नाही तर काँग्रेसवर अनेकांनी डाव लावला आहे. याआधी सट्टाबाजारात भाजपची चलती होती, परंतु आता हवा बदलली आहे. अनेक सर्व्हेतून सत्ताधारी भाजप पायउतार होणार असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सट्टाबाजारात काँग्रेसची हवा आहे. गेल्या दोन आठवड्यांमध्ये सट्टाबाजारातील हवेचा कल भाजपकडून काँग्रेसकडे वळला आहे.
इंग्रजी वृत्तपत्र ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या एक महिन्यात भोपाळमधील सट्टाबाजारात भाजपवर सर्वाधिक डाव लावण्यात येत होता. परंतु सध्या काँग्रेसची हवा आहे. सट्टाबाजारात गेल्या महिन्यात भाजपवर एखाद्या व्यक्तीने 10 हजार लावले असते व भाजप विजयी झाल्यास त्याला 11 हजार रुपये मिळाले असते, तर काँग्रेसवर 4400 रुपये लावल्यास आणि विजयी झाल्यास 10 हजार रुपये मिळाले असते. परंतु आता सर्व उलटे झाले आहे. भाजपपेक्षाही काँग्रेसची विजयाची संधी अधिक असल्याने भाजपचा सट्टाबाजारातील भाव पडला आहे.
मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्ष मॅजिक फिगरपासून दूर राहण्याची देखील शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच सध्या कोणता पक्ष विजयी होईल यापेक्षा कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील यावर सट्टा लावण्यात येत आहे. विषेश म्हणजे सट्टाबाजार बेकायदेशीर असतानाही पोलिसांच्या नाकावर टिच्चून हा खेळ सुरू आहे.
मध्य प्रदेशमध्ये येत्या 28 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. 230 विधानसभा जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत काँग्रेसला 116 तर भाजपला 102 जागा मिळण्याची भविष्यवाणी व्यक्त केली जात आहे.




























































