पाण्याची पातळी खालावणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। नगर

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये भूजल पातळी तपासणीचे काम हाती घेतले आहे. या पाहणीचा अंदाज फेब्रुवारी महिन्यात प्रसिद्ध केला जाणार आहे. मात्र, यंदा पडलेल्या पावसाचे प्रमाण पाहता जानेवारी महिन्यातील भूजल पातळीमध्ये दोन ते तीन मीटरने घट होण्याची शक्यता असल्याचे भूजल सर्वेक्षण विभागातून सांगण्यात आले.

एका वर्षात किमान जानेवारी, मार्च, मे आणि सप्टेंबर/ऑक्टोबर अशा महिन्यांमध्ये भूजल पातळीची पाहणी केली जाते. त्यानुसार सप्टेंबर 2018 मध्ये केलेल्या पाहणीनुसार नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, राहुरी, नेवासे, कर्जत, जामखेड, श्रीगोंदे, संगमनेर, कोपरगाव, राहाता या बारा तालुक्यांमधील भूजल पातळी मागील पाच वर्षांमधील सरासरी भूजल पातळीपेक्षा कमी झाल्याचे आढळले होते. त्यातच यंदा जून 2018 ते ऑक्टोबर 2018 या काळात जिल्ह्यात सरासरी 70 टक्के पाऊस पडला. पावसाची ही टक्केवारी सरासरीच्या तुलनेत खूपच कमी असल्यामुळे जानेवारी महिन्यात भूजल पातळीत अधिकच घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या पाच वर्षांतील भूजल पातळीचा तुलनात्मक अभ्यास करता यंदा परिस्थिती अधिकच बिकट असल्याचे या विभागातून सांगण्यात आले.

202 विहिरींच्या पाणीपातळीचे निरीक्षण

भूजल पातळीची पाहणी करताना भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वतीने जिल्ह्यातील 202 विहिरींचे निरीक्षण करण्यात येते. यामध्ये नगर तालुक्यातील 20, पारनेर 15, पाथर्डी 8, शेवगाव 18, श्रीरामपूर 12, राहुरी 14, नेवासे 12, कर्जत 15, जामखेड 11, श्रीगोंदे 18, संगमनेर 26, अकोले 13, कोपरगाव 15 व राहाता तालुक्यातील 5 विहिरींचा समावेश आहे. या विहिरींमधील पाणी पातळी मोजण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.

भूजल मूल्यांकनाचे काम पूर्ण

जिल्ह्याचे भूजल मूल्यांकन करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. याबाबतचा अहवाल भूजल सर्वेक्षण व विकास विभागाने पुणे येथील कार्यालयामध्ये सादर केला आहे. पुणे येथून हा अहवाल केंद्रीय भूजल बोर्डाकडे पाठवला असून या बोर्डाची मान्यता मिळाल्यानंतर जिल्ह्यातील अतिविकसित श्रेणीत असणार्‍या (डार्क झोन) पाणलोट क्षेत्रातील गावांची यादी जाहीर करण्यात येणार आहे.