नागपूरमध्ये फडणवीस, बावनकुळेंना मोठा धक्का; पंचायत समिती सभापती निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील सत्ताधारी भाजपला नागपूरमध्ये चांगलाच फटका बसला आहे. पंचायत समिती सभापती पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष असणाऱ्या कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीने जोरदार मुसंडी मारत भाजपचा सुपडा साफ केला आहे. नागपूर जिह्यातील 13 तालुक्यांमधील पंचायत समितीत सभापती पदाची एकही जागा भाजपला जिंकता आली नाही. नागपूरमधील हा पराभव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

महाविकास आघाडीमध्ये फूट पाडून महाराष्ट्रात काही महिन्यांपूर्वी भाजपने सत्तांतर घडवून आणले. मात्र, त्याच भाजपचा गड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूरमध्ये शनिवारी झालेल्या पंचायत समिती व उपसभापती पदाच्या निवडणुकीत कॉँग्रेस-राष्ट्रवादीने शिंदे-फडणवीस सरकारला धोबीपछाड देत विजय मिळवला. 13 तालुक्यांत सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने तब्बल 9, राष्ट्रवादीला 3 जागांवर विजय मिळाला. तर शिंदे गटाला रामटेक तालुक्यात सभापती पदाच्या निवडणुकीत यश मिळाले.

प्रदेशाध्यक्षांच्या तालुक्यातही पाटी कोरी

नागपूर जिह्यातील 13 तालुक्यांतील एकाही पंचायत समितीत भाजपचा उमेदवार विजयी झाला नाही. भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे होमपीच असणाऱ्या कामठी तालुक्यातील पंचायत समितीत भाजपची पाटी कोरी राहिली. रामटेक, कुही अणि मौदा या तीन तालुक्यांत भाजपला उपसभापती पद मिळाले.

9 तालुक्यांत कॉँग्रेसचा झेंडा

नागपूर ग्रामीण, कामठी, सावनेर, कळमेश्वर पारशिवनी, उमरेड, मौदा, कुही, भिवा या नऊ तालुक्यांत कॉँग्रेसचा झेंडा फडकला. मौदा पंचायत समितीत निवडणुकीत दोन्ही पक्षांना सारखी मते मिळाली. यामुळे ईश्वरी चिठ्ठीने निर्णय घेण्यात आला. यामध्ये कॉँग्रेसचा उमेदवार विजयी झाला.

3 ठिकाणी राष्ट्रवादीची बाजी

राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विधानसभा मतदारसंघातील काटोल आणि नरखेड तालुक्यांत सभापतीपद राष्ट्रवादीकडे ठेवण्यात यश आले. तसेच हिंगणा तालुक्यातील सभापतीपदाच्या निवडणुकीतही राष्ट्रवादीने बाजी मारली.