मॉब सीन टाळा, दाट लोकवस्तीत शूटिंग करू नका! शूटिंगसाठी मराठी चित्रपट महामंडळाची नियमावली

राज्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारीचा उपाय म्हणून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने शूटिंगबाबत नियमावली जाहीर केली आहे. कमीत कमी लोकांमध्ये शूटिंग करा, मॉब सीन टाळा आणि दाट लोकवस्तीत शूटिंग करू नका, अशा सूचना निर्मात्यांना महामंडळाने दिल्या आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे, सांस्कृतिकमंत्री अमित देशमुख यांच्यासह मनोरंजन क्षेत्रातील विविध युनियन, महामंडळाचे सदस्य आणि कलाकारांची ऑनलाइन बैठक पार पडली होती. यावेळी शूटिंग बंद करणार नाही, परंतु निर्मात्यांनी सर्व प्रकारची खबरदारी घेतली पाहिजे अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या. याला अनुसरून महामंडळाने ही नियमावली जाहीर केली आहे. शूटिंगला परवानगी दिल्याबद्दल चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांचे आभार मानले आहेत.

कंटेनमेंट झोनमधील कलाकारांना बंदी

गर्दीच्या ठिकाणांऐवजी इनडोअर, आऊटडोअर स्टुडिओज किंवा शहराबाहेरील रिसॉर्ट, बंगल्यांमध्ये शूटिंग करा, कायदेशीर परवानगी घेऊनच शूटिंग करा, शूटिंग सुरू असताना लोकेशन सोडून इतरत्र भटकू नका, सेट वारंवार सॅनिटाइज करावा, सेटवर सॅनिटायझर, ऑक्सिमीटर, टेंपरेचर गन असावे, कंटेनमेंट झोनमधील व्यक्तींना शूटिंगसाठी बोलावू नका, जास्तीत जास्त कामगारांना काम मिळावे म्हणून त्यांना रोटेशन पद्धतीने बोलवा अशा सूचना नियमावलीत केल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या