निवडणुका संपेपर्यंत काँग्रेसवर करासाठी जबरदस्ती करणार नाही; आयकर विभागाचे सर्वोच्च न्यायालयात स्पष्टीकरण

supreme-court

लोकसभा निवडणुका जवळ आल्यावर आयकर विभागाने काँग्रेसला दोन नोटीस पाठवल्या आहेत. आयकर विभागाकडून तब्बल 3,567 कोटींची कर थकबाकी भरण्यासाठी नोटिस आल्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणाच्या सुनावणीवेळी निवडणुकास संपेपर्यंत करासाठी काँग्रेसवर कोणतीही जबरदस्ती करण्यात येणार नाही, असे आयकर विभागाकडून सर्वोच्च न्यायालयात सांगण्यात आले. या प्रकरणाची पुढील सुनावणी 24 जुलै रोजी होणार आहे.

आयकर विभागाकडून 3,567 कोटींची कर थकबाकी भरण्याची मागणी करणाऱ्या नोटिसा मिळाल्यानंतर काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती बीव्ही नागरथना यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर हे प्रकरण सुनावणीसाठी आल्यावर सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले की, लोकसभा निवडणुका संपेपर्यंत विरोधी पक्षाच्या विरोधात कोणतीही जबरदस्ती कारवाई करणार नाही. तसेच फक्त निवडणुकीपर्यंत आम्ही कोणतीही कारवाई करणार नाही. त्यानंतर याबाबत पुढील कारवाई करण्यात येणार आहे. मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, निवडणुका सुरू असल्याने कोणत्याही पक्षाला कोणतीही अडचण येऊ नये अशी विभागाची इच्छा आहे.