ओमटेक्स इन्स्टिटय़ूट घडवणार क्रिकेटपटू, युवा खेळाडूंना मिळणार मार्गदर्शन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्रिकेटमध्ये करीअर करण्यास इच्छुक असलेल्या मुंबईसह महाराष्ट्रातील युवा खेळाडूंसाठी आनंदाची बातमी आहे. ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट इन्स्टिटय़ूट यांच्या पुढाकाराने 2, 3 व 4 एप्रिल रोजी अनुक्रमे 19, 16 व 14 वर्षांखालील युवा गुणवान क्रिकेटपटूंचा शोध घेतला जाणार आहे. यामधून प्रत्येकी एक मुलगा व मुलगी यांची निवड करण्यात येणार असून त्यांना एक वर्ष विनामूल्य प्रशिक्षण शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे.

सफाळे येथे आठ एकर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम आकाराला आले आहे. यामध्ये इनडोअर प्रशिक्षण केंद्रही विकसित करण्यात आले आहे. या प्रशिक्षण केंद्रात जर्मनीतील ईबाको या कंपनीच्या सहाय्याने टर्फ बसवण्यात आले आहे. तसेच इंग्लंडमधील पिच व्हीजन या कंपनीच्या तंत्रज्ञानाचा येथे वापर करण्यात आला आहे. 2, 3 व 4 एप्रिल रोजी होणाऱया निवड चाचणीत युवकांनी सहभाग घ्यावा, असे आवाहन ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट इन्स्टिटय़ूटचे प्रकल्प प्रमुख माजी कसोटीपटू सुरू नायक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9321438723 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

शनिवार-रविवार प्रशिक्षणाचा लाभ

ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट इन्स्टिटय़ूट यांच्याकडून निवड चाचणीनंतर शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. निवड चाचणीतून निवडण्यात आलेल्या खेळाडूंना शनिवार-रविवार या दोन दिवसांमध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. समीर गवस, अजित रॉड्रिग्स व मयूरेश येलवे यांच्या मार्गदर्शनाखाली युवा खेळाडू क्रिकेटचे बारकावे आत्मसात करणार आहेत.

रणजीचा सामना होऊ शकतो

सफाळे येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम तयार झाले आहे. सध्या येथे प्रेक्षकांची गॅलरी बनवण्यात आलेली नाही. पण भविष्यात त्याचीही सुविधा केली जाईल. तसेच रणजी लढतीही येथे खेळवण्याची शक्यता आहे. यंदाचा आयपीएलचा मोसम सुरू होण्याआधी कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे शिबीरही येथे आयोजित करण्यात येणार होते, पण काही कारणास्तव या संघाचे शिबीर येथे होऊ शकले नाही.

भविष्य उज्ज्वल

ओमटेक्स आयसीडब्ल्यूसी क्रिकेट इन्स्टिटय़ूटच्या गुणवत्ता शोधमोहिमेद्वारे निवडण्यात आलेल्या खेळाडूंचे भविष्य उज्ज्वल असणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनशी संलग्न असलेल्या क्लब्समधून हे खेळाडू खेळू शकणार आहेत. यामुळे आपली चमक दाखवण्यासाठी या युवा खेळाडूंना भक्कम व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.