वाखरी परिसरात बिबट्याचा वावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। पंढरपूर

वाखरी परिसरात बिबट्याचा वावर वाढला असून. शिरढोण व वाखरी परिसरात बुधवारी बिबट्या व त्याचा बछडा आढळला. या बिबट्याने शेळीवर हल्ला केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून या भागात तरस आहे की बिबट्या यावर चर्चा रंगत होती. वनविभागाने हा प्राणी तरस असल्याचे सांगितले होते. पण आता विष्ठेची तपासणी केली असता व पावलांचे ठसे पाहून बिबट्याच असल्याचे पुढे आले आहे. बुधवारी सकाळी शिरढोण परिसरात बिबटयाला पाहिल्याचे काही शेतकरी व ट्रॅक्टर चालकांनी सांगितले होते. यानंतर वनविभागाने या भागात तपासणी सुरू केली. दुपारी या बिबट्या व त्याचा बछडा वाखरी परिसरात पाहिल्याचे शेतात काम करणार्‍या महिलांनी सांगितले. त्यांनी आरडाओरड केल्याने ते पळून गेले. मात्र या बिबट्याने वाखरी येथील योगेश पांढरे यांच्या शेतात शेळीवर हल्ला केला आहे. यात शेळी जखमी झाली. येथील लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्या पळून गेल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान कार्तिकी यात्रेच्या अगोदरपासून वाखरी परिसरात बिबट्या असल्याची चर्चा सुरू आहे. वनविभागाने यासाठी येथे पिंजरा ही लावला होता. प्रारंभी हे जनावरं तरस असल्याचे सांगितले गेले होते. याच वाखरीच्या पालखी तळाच्या जागेत प्रसिध्द जनावरांचा बाजार भरतो. पाच हजाराहून अधिक जनावरे येथे विक्रीसाठी आणली जातात. दरम्यान बिबट्या मादी व बछडा येथे असावी अशी चर्चा आहे. या प्रकाराने वाखरीसह शिरढोण भागात भीतीचे वातावरण आहे. येथे सर्वत्र ऊस असल्याने प्राण्यांना लपण्याची मोठी जागा आहे.