
सामना प्रतिनिधी। पनवेल
‘बेटी म्हणजे धनाची पेटी’ असे म्हटले जाते. सरकारही यासाठी मोहीम राबवत आहे. मात्र पनवेलमध्ये मुलगी झाली म्हणून चक्क पत्नीच्या डोक्यात सिलिंडर घातल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. या घटनेत रक्तबंबाळ झालेल्या पत्नीवर जे.जे. रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी माथेफिरू नवरोबाला बेडय़ा ठोकल्या आहेत.
पनवेल तालुक्यातील हेदुटणे येथील बालाजी रेसिडेन्सीमध्ये राहणारा अल्पेश भोसले (30) याचे तीन वर्षांपूर्वी दापोलीच्या अवनी हिच्याबरोबर लग्न झाले होते. मात्र मुलगी झाल्याने दोघांमध्ये गेले वर्षभर वाद सुरू होता. 5 नोव्हेंबर रोजी दिवाळीची खरेदी करण्यासाठी दोघेही मुलीला घेऊन पनवेल येथे जाण्यास निघाले. त्याचवेळी मंडणगड येथे राहणाऱया सासूचा दूरध्वनी आला आणि त्यानंतर नेहमीप्रमाणेच वाद उकरून काढत अल्पेशने अवनी हिला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर घरात असलेला पाच किलोचा सिलिंडर डोक्यात घातला. बॅटनेही डोक्यात मारहाण केली. अक्षरशः गुराढोरासारखीच मारहाण केल्याने अवनी घरात रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्धावस्थेत पडली.
तक्रार मागे घे.. नाहीतर बघून घेईन!
अवनीला झालेल्या मारहाणीची माहिती कळताच तिचा भाऊ जयराज खोपकर व वडिलांनी तत्काळ पनवेल गाठून तिला जे.जे. रुग्णालयात दाखल केले. गेल्या आठ दिवसांपासून चिंताजनक असलेल्या अवनीचा जीव वाचवण्यासाठी डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करत आहेत. मात्र दोन दिवसांपूर्वी पती अल्पेश याने रुग्णालयात जाऊन तक्रार मागे घ्या, नाहीतर बघून घेईन, अशी धमकी दिल्याचा आरोप अवनीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारी केला आहे.































































