
पनवेल-कर्जत उपनगरीय रेल्वे मार्गावर लवकरच लोकल ट्रेन धावणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनद्वारे (एमआरव्हीसी) ‘मुंबई अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोजेक्ट फेज-3’ अंतर्गत काम केले जात असलेल्या या प्रकल्पाचे 99 टक्के प्रत्यक्ष काम पूर्ण झाले आहे. या प्रकल्पामुळे उपनगरीय रेल्वेची कनेक्टिव्हिटी आणि कार्यात्मक लवचिकता आणखी सुधारणार असून नवी मुंबई, रायगड आणि आसपासच्या परिसरातील विकासाला चालना मिळणार आहे.
2,782 कोटी रुपये मंजूर खर्चातून 29.6 किमी लांबीच्या दुहेरी उपनगरीय रेल्वे मार्गाचे काम करण्यात येत आहे. प्रकल्पांतर्गत नागरी अभियांत्रिकीची प्रमुख कामे मोठय़ा प्रमाणात पूर्ण झाली आहेत. यामध्ये 9 मोठे पूल, 35 छोटे पूल, 5 रोड ओव्हर ब्रिज, 16 रोड अंडर ब्रिज आणि पनवेल व कर्जत येथील दोन्ही रेल्वे फ्लायओव्हर्सचे काम पूर्ण झाले आहे. तसेच तीनही बोगद्यांचे काम, बोगद्यांतील विद्युत आणि यांत्रिक कामे प्रगतिपथावर आहेत. रेल्वे मार्ग जोडणी (ट्रक लिंकिंग) पूर्णत्वाच्या दिशेने असून एकूण 69.70 किमीपैकी 68.70 किमी मार्ग बनवण्यात आला आहे. तसेच 68.70 किमी अंतरापर्यंत खडीचा थर तयार करण्याचे आणि ट्रक नूतनीकरणाचे कामही झाले आहे.
सिग्नलिंगची कामे 95 टक्क्यांपर्यंत
चिखले आणि मोहापे येथील स्थानक इमारती, चौक येथे स्थानक इमारत व सब वे, प्लॅटफॉर्मवरील शेल्टर आणि परिसरातील कामे झाली आहेत. कर्जत स्थानकावर प्लॅटफॉर्मचा विकास, स्थानक इमारती, प्लॅटफॉर्मवरील छत, लिफ्ट, सरकते जिने आणि इतर प्रवासी सुविधांचे काम अंतिम टप्प्यात आहे. सिग्नलिंगची कामे सुमारे 95 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहेत. संपूर्ण प्रकल्प डिसेंबर 2026 पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.



























































