अतिवृष्टीमुळे पारनेर तालुक्यात हाहाकार, पुराच्या पाण्याने गावे वेढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पारनेर तालुक्याच्या पश्चिम भागात गुरुवारी रात्री झालेल्या ढगफुटीमुळे, तसेच इतरत्र झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे हाहाकार उडाला. ढगांचा गडगडाट व विजांच्या धडकी भरविणाऱया कडकडाटात तब्बल तीन तास सुरू असलेल्या बेभान पावसामुळे नागरिक भयभीत झाले होते. पावसामुळे कांदा, ऊस, सोयाबीन, मका व इतर चारापिकांचे अतोनात नुकसान झाले.

पारनेर तालुक्यात गुरुवारी दिवसभर आकाश निरभ्र होते. कडकडीत ऊन पडले होते. मात्र, मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर एवढा मोठा होता की, अवघ्या काही मिनिटांतच गावागावांतील ओढय़ा-नाल्यांनी रौद्ररूप धारण केले. त्यातच ग्रामीण भागातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाल्याने धडकी भरविणारे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नद्या, तसेच ओढय़ा-नाल्यांना मोठा पूर आल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. निघोज, देवीभोयरे येथील नद्यांना पूर आल्याने गव्हाणवाडी फाटा ते बेल्हे या राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुमारे नऊ तास बंद होती. पारनेर-अळकुटी मार्गावर लोणीमावळा येथे पुरामुळे वाहतूक ठप्प झाली होती. पिंपळनेर-राळेगण थेरपाळ, पिंपरी जलसेन-निघोज या रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली होती. शुक्रवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ओढे व नद्यांचा पूर ओसरल्यावर वाहतूक सुरळीत झाली. ‘प्रतिपंढरपूर’ म्हणून ओळखल्या जाणाऱया पिंपळनेर येथील संत निळोबाराय मंदिराचा परिसर जलमय झाला आहे. मंदिरासमोरील ओढय़ाला मोठा पूर आला आहे.

तालुक्यात सुमारे 10 हजार हेक्टर क्षेत्रावर कांद्याची लागवड झाली होती. पावसामुळे कांदापीक जवळपास नष्ट झाले आहे. लागवडीसाठी प्रतिएकर कमीत कमी 10 हजार रुपये खर्च आला आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱयांचे कोटय़वधी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. ऊस, सोयाबीन यांसह इतर पिकांचे झालेले नुकसान वेगळेच आहे.

शेतकऱयांच्या दिवाळ सणावर नैराश्याचे सावट

n गेले दोन महिने सातत्याने पडत असलेल्या पावसामुळे पिकांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले होते. गुरुवारच्या पावसामुळे उरलीसुरली पिके नष्ट झाली आहेत. त्यामुळे शेतकऱयांच्या दिवाळी सणावर नैराश्याचे सावट पसरले आहे. सततच्या पावसामुळे वाटाणा, मूग, बाजरी या पिकांचा उत्पादनखर्चही भागला नाही. तोटा सहन करावा लागला. सोयाबीन मात्र चांगले साधले होते. सोयाबीनमुळे यंदाची दिवाळी आनंदात जाईल, असे वाटत होते. गेल्या आठवडय़ात पावसाने उघडीप दिल्याने सोयाबीनची काढणी केली. शेतातून सोयाबीन घरापर्यंत वाहून आणायच्या आधीच पावसाने झोडपून काढले. शेतात काढून ठेवलेले सोयाबीन पाण्याखाली गेले आहे.

मळगंगा देवीच्या मंदिराजवळ पाणी

n निघोज ः परिसरात शुक्रवारी मध्यरात्री दोन ते सकाळी सहाच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला. शिवाय कुकडी डावा कालव्यातील धरण परिसरात मोठय़ा प्रमाणात पाऊस झाल्याने कुकडी नदीला पाटबंधारे विभागाने 16 हजार 500 क्युसेकने विसर्ग सुरू केला आहे. त्यामुळे जगप्रसिद्ध रांजणखळगे परिसरातील मळगंगा देवीच्या मंदिराजवळ पाणी आले असून, नदीकाठच्या रहिवाशांनी सावध राहण्याचे आवाहन तालुका प्रशासन व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱयांनी केले आहे.