प्रसिद्ध पारशी डेअरी मिठाईच्या दुकानाचा परवाना निलंबित, अन्न सुरक्षा व स्वच्छतेसंदर्भात अनेक गंभीर त्रुटी आढळल्या

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दक्षिण मुंबईतील प्रसिद्ध असलेल्या पारशी डेअरी या नामांकित मिठाईच्या दुकानावर अन्न व औषध प्रशासनाने धडक कारवाई केली. शुद्ध मिठाईसाठी परिचित असलेल्या या दुकानात अन्न सुरक्षा व स्वच्छतेसंदर्भात अनेक गंभीर त्रुटी आढळून आल्याने एफडीएने या दुकानाचा परवाना तत्काळ निलंबित केला आहे.

एफडीएच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी 14 जुलै रोजी काळबादेवी येथील प्रिन्सेस स्क्रिप्ट असलेल्या पारशी डेअरीवर धडक दिली. अधिकाऱ्यांनी दुकानाची तपासणी केली असता अन्न सुरक्षा व मानके अधिनियम – 2006 तसेच अन्न व्यवसाय परवाना व नोंदणी नियम – 2011मधील विविध तरतुदींचे गंभीर उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आले. याची तत्काळ गंभीर दखल घेत एफडीएच्या परिमंडळ-1च्या सहाय्यक आयुक्तांनी पारशी डेअरीचा परवाना निलंबित केला. निलंबन कालावधीत संबंधित आस्थापनेला अन्नपदार्थांचे उत्पादन, साठवणूक, विक्री किंवा वितरण करण्यास मनाई करण्यात आली असून आदेशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे एफडीएच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

दुकानाच्या तपासणीत काय आढळले…

एफडीए अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणी दरम्यान प्रमुख त्रुटींमध्ये कच्च्या दुधाच्या स्वीकारासाठी संरक्षित कच्चा दुधाचा स्वीकार कक्ष नसणे, साठवण कक्ष व उत्पादन विभागातील भिंतींवर बुरशीची वाढ झालेली, कच्चा माल थेट जमिनीवर साठविणे, बुरशीग्रस्त भिंतीलगत कच्चा माल ठेवणे, उत्पादन विभागात अस्वच्छता, माशांचा मोठय़ा प्रमाणात वावर, कीटक व उंदीर प्रतिबंधक जाळ्यांचा अभाव, सांडपाणी प्रक्रिया यंत्रणा (ETP) नसणे, अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय नोंदी अपूर्ण असणे, योग्य सुरक्षात्मक पादत्राणे उपलब्ध नसणे, वाहन स्वच्छतेच्या नोंदी उपलब्ध नसणे तसेच अनेक अन्नपदार्थांवर अनिवार्य माहिती नसणे अशा गंभीर बाबींचा समावेश आहे.