
कर्नाटकात निवडणुकीची चाहूल लागली आहे. कारण एअरो शोनिमित्ताने बंगळुरूत आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी रात्री कन्नड सिनेसृष्टीतील कलावंत, खेळाडू आणि सोशल मीडिया स्टार्सची भेट तर घेतलीच, पण त्यांच्यासोबत स्नेहभोजनही केले.
मोदींची भेट घेण्यासाठी बंगळुरातील राजभवनावर रात्री झुंबडच उडाली होती. केजीएफचा स्टार यश, कंथाराचा नायक रिषभ शेट्टी यांच्यासह माजी क्रिकेटपटू अनिल कुंबळे, श्रीनाथ, व्यंकटेश प्रसाद, मयंक अग्रवाल, मनीष पांडे, उद्योगपती तरुण मेहता, निखिल कामथ असे अनेक दिग्गज यावेळी उपस्थित होते.
कर्नाटकातील सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक या क्षेत्रातील घडामोडींवर मोदींनी या पाहुण्यांशी बातचित केली. दिवंगत अभिनेता पुनीत राजकुमार याची पत्नी अश्विनी यावेळी उपस्थित होते.
मोदी म्हणाले, अय्यो!
कन्नड भाषिकांमध्ये श्रद्धा ही सोशल मीडियाची स्टार म्हणून ओळखली जाते. ‘अय्यो श्रद्धा’ याच नावाने ती परिचित आहे. मोदी यांनी श्रद्धाला पाहताच तिचे ‘अय्यो’ म्हणून स्वागत केले, असे श्रद्धाने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहे.



























































