
एका आठ वर्षीय मुलाच्या गुप्तांगावर चार तरुणांनी पेट्रोलनेे भरलेले इंजेक्शन दिल्याचा भयंकर प्रकार समोर आला आहे. या घटनेनंतर आरोपींनी तिथून पळ काढला. मात्र मुलगा तडफडू लागल्यावर त्याला घरच्यांनी सिव्हील रुग्णालयात दाखल करुन त्याच्यावर उपचार सुरु आहेत.
पंजाबच्या फिरोजपूरमध्ये एका गावात ही घटना घडली आहे. पीडित गरीब कुटुंबातील असून आई आणि दोन बहीणी असा त्यांचा परिवार आहे. 7 एप्रिल रोजी त्याच्या शेजारी राहणाऱ्या तरुणाने त्याला घरी बोलावले. त्यावेळी त्याच्या घरात त्याचे आणखी तीन मित्र होते. त्या विकृत मुलांनी पेट्रोलने भरलेले इंजेक्शन तिथे असलेल्या कुत्र्याला दिले आणि त्यानंतर ते इंजेक्शन त्या मुलाला जमिनीवर झोपवून त्याच्या गुप्तांगावर दिले. मुलाने आरडाओरडा केल्यावर ही मुलं पळून गेली. त्यानंतर या मुलाची तब्येत बिघडली. गुप्तांगाच्या इथे जळजळ व्हायला लागल्यावर तो तडफडायला लागला. त्याला जीरा येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले.
आरोपी घटनेनंतर गावातून फरार झाले होते. सिविल रुग्णालयाच्या डॉ. हरमन यांनी सांगितले की, मुलावर उपचार सुरु असून आता त्याची तब्येत ठिक आहे. पोलीस ठाण्याचे सदर प्रभारी चरणजीत सिंह रंधावा यांनी त्यांच्याकडे तक्रार दाखल झाल्याची माहिती दिली आहे. या घटनेचा ते कसून तपास करत आहे. त्यानंतर आरोपींविरोधात कारवाई केली जाईल. पीडित मुलाच्या आईने सरपंचाच्या समोर हे प्रकरण ठेवले होते. मात्र तिथे त्यांना न्याय मिळाला नाही. त्यानंतर त्यांनी पोलीसात तक्रार केली.




























































