सरकारच्या फसवणुकीमुळेच तरुणाई रस्त्यावर; राज ठाकरे यांचा हल्ला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
raj-thackeray-slams-government-over-youth-protests-unemployment-paper-leak-mms-rally-mumbai-marathi-jobs

‘महाराष्ट्रातील मराठी मुला-मुलींना हक्काच्या नोकऱ्या मिळाल्याच पाहिजेत. यासाठी कोणाचेही पाय धरायला लागले तरी मी तयार आहे’, असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. ‘सरकारच्या फसवणुकीमुळेच तरुणाई रस्त्यावर उतरली असून राजकीय भूलथापांना न बळी पडता सरकारवर तीव्र दबावगट निर्माण करा’, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.

राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सरकारवर तोफ डागली. मी आज तुमच्या रागात सामील व्हायला आलो आहे. हा तुमचा राग कायम असणे गरजेचे आहे, असे राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले.

एकाच बाजूने ‘मन की बात’ चाललीय

आज देशात आणि राज्यात बेधुंदशाही सुरू आहे. कोणालाही लोकांचे ऐकायचे नाही. फक्त एकाच बाजूने ‘मन की बात’ सुरू आहे. जणू लोकांच्या शब्दाला मनच उरलेले नाही. तुमच्याकडे पेपर फुटतात आणि आमच्याकडे मतं फुटतात. या सगळ्या प्रकारात बळी मात्र सामान्य माणसाचाच जातो, असा संताप राज ठाकरे यांनी व्यक्त केला.

‘त्या’ नेत्यांना धडा शिकवा

सर्व सरकारी संस्थांचे खासगीकरण चालले आहे. सरकारी नोकऱ्या उरल्याच नाहीत तर आरक्षण कुठे मिळणार? निवडणुका आल्या की पैसे, दारू आणि जेवणावळी वाटून निवडून येणाऱ्या नेत्यांचा गैरसमज तुम्हालाच दूर करावा लागेल. जोपर्यंत तुम्ही मतपेटीतून या लोकांना धडा शिकवणार नाही, तोपर्यंत न्याय मिळणार नाही, असे राज ठाकरे म्हणाले.